Latest

फडणवीसांची ती ‘भविष्यवाणी’ अन् दिमाखात विजय! नगरच्या युवा नेत्यानं महाराष्ट्राला अचंबित केलं होतं…

महाराष्ट्र राजकारणात आत्तापर्यंत अनेक राजकीय पेच आणि नाट्य रंगलीत. नगरचं राजकारणही मागे नाहीए. नगरला, मुळात राजकारणाची पंढरी समजलं जातं. राज्याला याच जिल्ह्यानं सहकार दिलाय. नगरच्या राजकारणातही अनेक नाट्य रंगली, ज्यांनी संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. असंच एक नाट्य रंगलं, जानेवारी-फेब्रुवारी २०२३ मध्ये… नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची’ निवडणूक होती. काँग्रेसचा अधिकृत एबी फॉर्म खिशात असूनही वडिलांनी माघार घेतली आणि लगेच मुलानं अपक्ष अर्ज भरला. हा झाला नाट्याचा एक भाग. याच राजकीय नाट्याचा दुसरा भाग, त्यापेक्षा जास्त रंजक होता. काँग्रेसची उमेदवारी वडिलांनी नाकारली, नंतर त्यांच्या मुलानं अपक्ष अर्ज भरला… पण याच अपक्षाला भाजपच्या पडद्यामागच्या रणनीतीनं थेट आमदार केलं. हायकमांड विरूद्ध स्थानिक नेते असा हा रंगलेला सामना… आजच्या या विश्लेषणात्मक व्हिडिओत आपण हाच रंगलेला सामना पाहणार आहोत.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. साल होतं, २०२३. या संपूर्ण नाट्याची सुरुवात झाली ती उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच १२ जानेवारी २०२३ ला… नाशिक पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या डॉ. सुधीर तांबेंना काँग्रेसनं पुन्हा एकदा अधिकृत उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाचा ‘एबी फॉर्म’ देखील पाठवण्यात आला. पण ऐनवेळी अनपेक्षित ट्विस्ट आला..! डॉ. सुधीर तांबे यांनी स्वतःचा अर्ज भरलाच नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र आणि युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. सुधीर तांबे यांनी जाहीर केलं की, “आता ही जागा मी नव्या पिढीकडे म्हणजेच सत्यजितकडं सोपवत आहे.” या एका निर्णयाने संपूर्ण काँग्रेस पक्षात आणि महाविकास आघाडीत खळबळ उडाली. काँग्रेस हायकमांडने याला शिस्तभंग मानत तांबे पिता-पुत्रांवर घाईघाईने निलंबनाची कारवाई केली.

या संपूर्ण वादात सर्वात मोठी गोची झाली, ती काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ, विश्वासू आणि निष्ठावंत नेते बाळासाहेब थोरातांची. थोरात हे सत्यजित तांबे यांचे सख्खे मामा ! थोरात हे काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ होते आणि आजही आहेत. गांधी कुटुंबाशी अत्यंत एकनिष्ठ राहिलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांच्यासमोर एका बाजूला पक्षाची शिस्त आणि हायकमांडचा आदेश होता, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे सख्खे भाचे होते. बाळासाहेब थोरातांना अंधारात ठेवून राज्य पातळीवर काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी तांबे परिवाराची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे थोरात अत्यंत व्यथित झाले होते. निवडणुकीच्या काळात ते आजारी असल्यामुळे काही काळ पडद्याआड राहिले, आणि तेवढ्यात काँग्रेसच्या काही नेत्यांनी सत्यजित यांची उमेदवारी कापून डाव साधल्याचे बोलले गेले. पण एवढं होऊनही थोरातांनी पक्षाविरोधात किंवा हायकमांडविरोधात एक शब्दही काढला नाही. निवडणूक संपल्यानंतर त्यांनी अत्यंत संयमी पण स्पष्ट भूमिका मांडली. “तांबे परिवाराला आणि मला बदनाम करण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक हे राजकारण खेळले,” अशी खंत त्यांनी बोलून दाखवली, ज्यामुळे त्यांच्यावरील जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास आणखी वाढला.

आता प्रश्न येतो की सत्यजित तांबे यांनी एवढा मोठा राजकीय धोका पत्करण्यामागे भाजपची काही भूमिका होती का? तर या संपूर्ण नाट्याची खरी सुरुवात झाली होती उमेदवारी अर्ज भरण्याच्या महिनाभर आधी, म्हणजेच ७ डिसेंबर २०२२ ला… सत्यजित तांबे यांनी अनुवादित केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी होते आणि मंचावर सत्यजित यांचे मामा बाळासाहेब थोरातही उपस्थित होते. त्यावेळी थोरातांकडे पाहत फडणवीसांनी मिश्किलपणे पण राजकीय सूचक विधान केलं होतं की, “सत्यजित तांबे यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला जास्त काळ बाहेर ठेवू नका. नाहीतर आमचा अशा लोकांवर डोळा असतो आणि आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत.” तेव्हा लोकांनी ती केवळ एक थट्टा मानली, पण महिनाभरातच जेव्हा सत्यजित यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला, तेव्हा फडणवीसांच्या त्या विधानाची खरी मेख सगळ्यांना समजली! अर्ज भरल्यानंतर भाजपने स्वतःचा कोणताही उमेदवार रिंगणात उतरवला नाही आणि पडद्यामागून सत्यजित तांबेंना पूर्ण बळ दिलं. जिल्ह्यातील बडे नेते विखे पिता-पुत्रांनीही, स्थानिक पातळीवर सत्यजित तांबेंच्या मागे सगळी यंत्रणा पूर्ण ताकदीनिशी लावल्याचे बोलले गेले.

तांबेंच्या या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. मूळच्या भाजप बंडखोर असलेल्या शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मविआने तातडीने शुभांगी पाटील यांना आपला अधिकृत पाठिंबा दिला. त्यामुळे ही लढत ‘सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील’ अशी थेट आणि प्रतिष्ठेची झाली. मविआच्या नेत्यांनी शुभांगी पाटील यांच्यासाठी जोरदार प्रचार केला, तर तांबेंनी पदवीधरांच्या मतदारांशी वैयक्तिक संपर्क आणि तरुणांमधील स्वतःची क्रेझ यावर भर दिला. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी झाली आणि सत्यजित तांबे यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच एकतर्फी विजय मिळवला.

-सत्यजित तांबे यांना पहिल्या पाच फेऱ्यात एकूण ६८,९९९ मतं मिळाली.
-तर मविआ पुरस्कृत शुभांगी पाटील यांना ३९,५३४ मतं मिळाली.
-सत्यजित तांबे हे २९,४६५ मतांनी विजयी झाले.

हा विजय इतका मोठा होता की, माजी आ. डाँ. सुधीर तांबे व सत्यजित तांबेंची पदवीधरांवरील पकड आणि बाळासाहेब थोरातांचा नाशिक विभागातील दबदबा आजही कायम आहे, हेच या निकालानं सिद्ध केलं.

मित्रांनो, नाशिक पदवीधरची २०२३ ची ही निवडणूक केवळ एका जागेची निवडणूक नव्हती, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील शह-काटशहाच्या राजकारणाचे उत्तम उदाहरण होते. वादळ आले, वाद झाले, पण बाळासाहेब थोरातांनी अत्यंत संयमाने आपली आणि पक्षाची प्रतिष्ठा जपली, तर सत्यजित तांबेंनी तरुण मतदारांच्या जोरावर विधानपरिषदेत दिमाखात प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button