Latest

7000 लीटर आमरस, 1 टन पुरण अन् 500 जावयांना जेवण..! धोंड्यानिमित्त आगडगावला भव्य जेवणाचा सोहळा

अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या एका भव्य आणि अनोख्या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.. तब्बल ७ हजार लिटर आमरस, एक टन पुरण आणि ५०० जावयांसाठी खास पारंपरिक जेवण.. असा हा आगडगावातील धोंड्याचा थाट पाहून सगळेच थक्क झालेत.

मंडळी, अधिक मासाच्या निमित्ताने श्री क्षेत्र काळभैरवनाथ आगडगाव येथे देवस्थानच्या वतीने तब्बल ५०० जावयांसाठी पारंपरिक धोंड्याच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले, तर १५ हजारांहून अधिक भाविकांसाठी महाप्रसादाची मोठी तयारी करण्यात आली.

अधिक मासात जावयांना मानपान देण्याची जुनी परंपरा आजही जपली जात आहे. आगडगावात आलेल्या सर्व जावयांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांना पाच पोशाख भेट देण्यात आले, तर मुलींना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीमुळे संपूर्ण गाव उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाले.

या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरला तो विक्रमी आमरस. तब्बल ३५०० किलो केशर आंबे आणि १००० लिटर दुधापासून जवळपास ७ हजार लिटर आमरस तयार करण्यात आला.

एवढंच नाही, तर पुरणपोळीच्या जेवणासाठी तब्बल एक टन हरभरा डाळीचे पुरण बनवण्यात आले. मंडळी, भक्ती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणारा हा सोहळा, महाप्रसाद आणि जावयांचा पारंपरिक सन्मान यामुळे हा सोहळा राज्यात चर्चेचा विषय ठरलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button