
हे फक्त भटक्या कुत्र्यांचं प्रकरण नाही… हा नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनलाय! मंडळी, गेल्या पाच वर्षांत राज्यात तब्बल 47 लाखांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अहिल्यानगरमधील तब्बल 3 लाख 26 हजार 781 नागरिकांचा समावेश आहे.
धक्कादायक म्हणजे, श्वानदंशाच्या घटनांमध्ये अहिल्यानगर राज्यातील जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
जिल्ह्यात दररोज सुमारे 75 ते 80 नागरिक कुत्र्याच्या चाव्यानंतर लस घेण्यासाठी रुग्णालयात येत असल्याची माहिती आहे. श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यात नुकत्याच भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले.
याच काळात अहिल्यानगरमध्ये 9 हजार 767 मांजरीच्या चाव्याच्या, तर 650 माकडाच्या चाव्याच्या घटनाही नोंदल्या गेल्या. राज्यात प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये पाच वर्षांत 134 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
निर्जंतुकीकरण, लसीकरण आणि संवेदनशील ठिकाणांवरील भटक्या कुत्र्यांबाबत प्रशासनाच्या उपाययोजनांवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत.





