
अहिल्यानगरच्या शिक्षण व्यवस्थेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात तब्बल १३० शाळा एकशिक्षकी आहेत आणि या शाळांमध्ये २ हजार ८३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. म्हणजे एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आहे.
एकाच शिक्षकाला फक्त शिकवायचं नसतं. त्याच्यावर मुख्याध्यापकाची जबाबदारी, शाळेचे प्रशासकीय काम, विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी, ऑनलाइन माहिती भरणे, पालकांशी संपर्क आणि पहिलीपासून सातवीपर्यंतच्या अनेक वर्गांना शिकवण्याची जबाबदारीही असते. त्यामुळे बहुवर्ग अध्यापन करावं लागत असून शिक्षकांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षकांची संख्या कमी आणि कामांचा भार जास्त, अशी परिस्थिती अनेक शाळांमध्ये आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील २५५ शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत. तर गेल्या आठ वर्षांत पटसंख्या घटल्यामुळे तब्बल ७५ जिल्हा परिषद शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या १० हजार २७४ शिक्षकांची पदे मंजूर असली, तरी २४५ पदे अजूनही रिक्त आहेत. मंडळी अहिल्यानगरमधील शिक्षणाच्या या स्थितीला कोण जबाबदार आहे? कमेंट करा..





