Latest

संगमनेरच्या भोंदू गडगेच्या १३ मालमत्ता; दोनशे व्हिडिओ हस्तगत ; व्हिडिओतील नागरिकांचीही चौकशी होणार

लोकांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र बापू गडगेच्या आश्रमातून तब्बल 200 पेक्षा जास्त व्हिडिओ पोलिसांनी जप्त केलेत. मंडळी, वडगाव पान येथील या आश्रमावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर एकामागून एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

पोलिस तपासात गडगे आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासे आणि राहाता या भागात एकूण १३ मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे.गडगे लोकांना कॅन्सरसारखे आजार बरे करतो, मूल नसणाऱ्या महिलांना मूल प्राप्त करून देतो अशा खोट्या आश्वासनांनी लोकांना जाळ्यात ओढत होता अंधश्रद्धेच्या नावाखाली तो लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत होता.

या प्रकरणात गडगेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमातून जप्त केलेले 200 हून अधिक व्हिडिओ आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नागरिकांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

तसेच आश्रमात एक प्रकारची मेडिकल रूमही चालवली जात होती. तिथून 90 पेक्षा जास्त सॅम्पल पोलिसांनी जप्त केले असून काही नमुने अन्न व औषध प्रशासनाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच लोकांना दिली जाणारी औषधे आणि साहित्य नेमकं कुठून येत होतं, याचाही तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button