
टी-शर्ट आता फक्त शरीर झाकणार नाही… तुमच्या शरीराची माहितीही सांगणार आहे. मंडळी, भविष्यात तुमच्या अंगावरील कपडेच आरोग्य तपासणीचं काम करू शकतात. आयआयटीडीएम, कांचीपुरमच्या संशोधकांनी वाहक धाग्यांच्या मदतीने कपड्यांमध्ये विशेष टेक्स्टाइल इलेक्ट्रोड विकसित केले आहेत. हे इलेक्ट्रोड शरीरातून निर्माण होणारे विद्युत संकेत टिपू शकतात.
याच तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधकांनी स्मार्ट टी-शर्टचा प्रोटोटाइप तयार केला आहे. हा टी-शर्ट शरीराशी संबंधित डेटा गोळा करण्यास मदत करू शकतो.
विशेष म्हणजे, या इलेक्ट्रोडची ५० वेळा धुवून चाचणी करण्यात आली. पाणी आणि डिटर्जंटने धुतल्यानंतरही त्यांच्या सिग्नल टिपण्याच्या क्षमतेवर मोठा परिणाम झाला नाही.
मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास हे स्मार्ट कपडे तुलनेने कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एम्ब्रॉयडरी आणि कंडक्टिव्ह धाग्यांसारख्या पद्धतींचा वापर करून त्यांची निर्मिती करता येईल.
म्हणजेच, भविष्यात आरोग्याची माहिती मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळी उपकरणं वापरण्याची गरज कमी होऊ शकते.





