
भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपले पाच उमेदवार जाहीर केले आहेत आणि यामध्ये एक नाव सध्या विशेष चर्चेत आलं आहे ते म्हणजे अहिल्यानगरमधील सुनील कर्जतकर. मंडळी, सुनील कर्जतकर यांना विधानपरिषदेवर आमदारकी मिळणार असल्याने जामखेड तालुक्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
सुनील कर्जतकर नेमके कोण आहेत, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ते जामखेड तालुक्यातील नान्नज गावचे रहिवासी असून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांचा पक्षातील प्रवासही खूपच वेगळा आणि मेहनतीचा राहिला आहे. १९९० साली त्यांनी जामखेड सोडलं आणि त्यानंतर ते थेट पुण्यात भाजपच्या कार्यालयात कार्यरत झाले. विशेष म्हणजे ते दिवस-रात्र पक्षासाठी काम करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा जवळचा संबंध असल्यामुळे त्यांना संघटनात्मक कामात मोठी जबाबदारी देण्यात आली.
पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना संघटनमंत्री पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर पक्षात त्यांचा प्रभाव वाढत गेला. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सुनील कर्जतकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देत भाजपने मोठा विश्वास दाखवला आहे.
मंडळी, शांतपणे काम करणाऱ्या आणि संघटनातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याला मिळालेली ही मोठी संधी म्हणूनही याकडे पाहिलं जात आहे.





