Latest

पुण्यातील कुख्यात कोयता गँग अहिल्यानगरमध्ये काय करतेय? गावठी पिस्तुलांसह ताब्यात !

अहिल्यानगरमध्ये पुण्यातील कुख्यात कोयता गँगची एंट्री झाल्याने मोठी खळबळ उडालीये. आणि धक्कादायक म्हणजे हे आरोपी थेट दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

मंडळी, पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या कोयता गँगच्या पाच सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. नगर तालुक्यातील मीरावली पहाडाच्या पायथ्याशी बुऱ्हाणनगर रस्त्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की काहीजण अग्निशस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत आहेत. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला.

पोलिसांची चाहूल लागताच एक आरोपी दुचाकीवरून पळून गेला. मात्र पोलिसांनी इतर चौघांना पाठलाग करून पकडलं. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीलाही नंतर अटक करण्यात आली.

या आरोपींकडून चार गावठी पिस्तुलं, दहा जिवंत काडतुसे, कोयता, चाकू आणि मोबाईल असा तब्बल दोन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आता सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की पुण्यातील ही कुख्यात गँग अहिल्यानगरमध्ये नेमकं काय करण्यासाठी आली होती? कोणत्या मोठ्या गुन्ह्याचा कट रचला जात होता? आणि या टोळीचे आणखी साथीदार जिल्ह्यात सक्रिय आहेत का?

सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मंडळी, ही घटना पुन्हा एकदा वाढत्या गुन्हेगारीचा गंभीर प्रश्न समोर आणणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button