
डायल ११२ या आपत्कालीन सेवेला खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या कॉल्सपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब मिठू शिंदे (वय ३५, रा. कात्रड, ता. राहुरी) यांनी २ मे रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता डायल ११२ वर कॉल करून कात्रड परिसरात वाद सुरू असल्याचे आणि काहीजण काठ्या व कोयते घेऊन मारहाण करण्यासाठी आल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे डायल ११२ पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, तपासणीदरम्यान तेथे कोणताही वाद किंवा मारहाण सुरू नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्ती मद्याच्या नशेत असल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी अशोक कुदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाबासाहेब शिंदे याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपत्कालीन सेवांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.





