Latest

Sangamner Crime | संगमनेरमध्ये गेल्या 48 तासांत काय काय झालं? झीरो तलाठी प्रकरण का गाजतंय?

सरकारी कार्यालयाचा ताबा घ्यायचा. तेथील अधिकाऱ्यांना चिरिमीरी देऊन खूष ठेवायचं. नंतर सगळा शासकीय कारभार आपल्या हातात घ्यायचा. अधिकाऱ्यांना त्यांचा वाटा मिळतो ते खूश, आणि शासकीय अधिकारी नसतानाही आपली कामं होतात, म्हणून नागरिक खूश… बरं, जी कामं फुकट व्हायला हवीत, त्यासाठी शे-दोनशे का देणं होईना, महत्त्वाचे दाखले मिळतात म्हणून अनेकजण त्यांच्या भोवती गोळा व्हायचे. आता तुम्ही म्हणाल, हे नेमकं काय सांगताय..? सांगते… संगमनेरचे आ. अमोल खताळ यांनी स्टिंग ऑपरेशन करुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर शुक्रवारी दोन व्यक्तींवर, सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार दोन दिवस सुरु होता.

या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुवातीला हा फक्त एक साधा प्रकार असल्याचं निदर्शनास आलं. आ. खताळ हे हिंदूत्ववादी पक्षाचे आमदार आहेत म्हणून काहींना हा स्टंट वाटला. परंतु दुसऱ्या दिवशी, ज्या व्यक्तीवर आक्षेप होता त्याचं जरा वेगळंच काळंबेरं उघड झालं. त्यानंतर हे प्रकरण किती गंभीर आहे, अशी कुजबूज सुरु झाली. आता पोलिस या सगळ्या प्रकाराचा तपास करताहेत. योग्य पद्धतीनं तपास झाला तर, काही धक्कादायक बाबी समोर येतील अशा शक्यता आहेत.

संगमनेरचे आ. अमोल खताळ यांना बुधवारी किंवा गुरुवारी एक मॅसेज आला. आ. खताळ यांच्या व्हाट्सअॅपवर त्यांच्याच मतदारसंघातील एका महिलेने एक कैफियत मांडली होती. त्या महिलेचं असं म्हणणं होतं की, संगमनेर तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारुनही कामे होत नाहीत. किरकोळ कामासाठी पैसे द्यावे लागतात. तक्रार छोटी होती. सामान्य होती. अनेक तलाठी कार्यालयात दाखले न मिळणं, कामे वेळेत न होणं, असं सगळं सुरु असतं. परंतु आ. खताळांनी या साध्या मॅसेजची दखल घेत गुरुवारी संगमनेरचं तलाठी कार्यालय गाठलं. तिथं गेल्यावर समजलं की तलाठी आणि कोतवाल अजून आलेले नाहीत.

सरकारी कोणताही कर्मचारी उपस्थित नसताना हे कार्यालय उघड कसं आणि ते कुणाच्या भरवशावर आहे, याची चौकशी करण्यात आली. या तलाठी कार्यालयाच्या चावडीतच एक व्यक्ती टेबल टाकून बसलेला दिसला. त्याचं नाव होतं आप्पा. आता हा आप्पा तलाठी असो नसो, नागरिकांची कामं करतो, असं तेथे उपस्थित असलेल्या काहींनी सांगितलं. आ. खताळ या आप्पाकडं गेले. आप्पाचं नाव होतं, मन्सूर पटेल अर्फ मन्सूरभाई… हा आप्पा सकाळी नऊलाच तलाठ्यांच्या ओसरीवर येतो. सोबत त्याचा जावईही असतो. जावई तलाठी कार्यालयाच्या आत व सासरा तलाठी कार्यालयाच्या ओसरीत बसतो. आ. खताळांनी हे सगळं पाहिल्यावर सरकारी कार्यालयाचा ताबा तुमच्याकडे कसा? असा सवाल केला.

आपल्याला प्रश्न विचारणारा व्यक्ती आमदार आहे, हे माहित असूनही या व्यक्तीने अगदी निर्विकार चेहऱ्यांने सुरुवातीला या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आमदारांचा संताप वाढल्यावर, तलाठी नसल्यावर आम्हीच काम पाहतो, असं या आप्पानं सांगितलं. त्यानंतर आ. खताळांनी आक्रमक होत प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना दुरध्वनी करुन हा प्रकार सांगितला. येथील तलाठ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

या आप्पाचा टेबल तपासला असता त्याच्याकडे तलाठ्यांनी सह्या केलेले उत्पन्नाचे दाखले, उतारे, नोंदी आणि सर्व सरकारी कागदपत्रे आढळून आली. तलाठी असो वा नसो, ज्याला जे लागेल ते हेच आप्पा पैसे घेऊन देत असल्याचे समोर आले. त्यानंतर नायब तहसीलदार भांगरे हे तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी हे मन्सूरभाई व त्यांच्या जावयाला, तलाठी कार्यालयातून बाहेर काढले आणि येथे पुन्हा बसू नका असे स्पष्ट आदेश दिले. हा प्रकार गंभीर होता. ही झाली गुरुवारची घटना. त्यानंतर शुक्रवारी या घटनेचा आणखी धक्कादायक अँगल समोर आला.

शुक्रवारी हाच मन्सूरभाई सकाळी नऊ वाजताच पुन्हा तलाठी कार्यालयात आला. त्याने तलाठी कार्यालय उघडले. ओसरीत बसून आतून कुलुप लावले. त्यानंतर येणाऱ्या-जाणाऱ्यांना जे हवे असतील, ते दाखले देण्यास सुरुवात केली. ओसरीला जाळी असल्याने बाहेरुन पैसे घ्यायचे आणि आतून दाखले द्यायचे, हा त्याचा प्रकार सुरु झाला. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास हाच मन्सूरभाई चहा घेण्यासाठी बाहेर आला. त्यानंतर त्याने एका टपरीवर चहा पिताना आ. खताळ यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले. त्यानंतर अचानक वातावरण तापलं. हा सगळा प्रकार काहींनी आ. खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला कळवला. त्यानंतर आ. खताळ यांचे कार्यकर्ते व काही स्थानिक नागरिक पु्न्हा त्या तलाठी कार्यालयात जमा झाले. त्यांनी या मन्सूरभाईच्या टेबलाची झाडाझडती घेतली. तेव्हा त्याच्या टेबलामध्ये अनेक गंभीर प्रकार लपविल्याचे दिसून आले.

या मन्सूरभाईच्या टेबलात तलाठ्याच्या नावाचा शिक्का, शासकीय कागदपत्रे, शासकीय रजिस्टर, मोहरा या नागरिकांनी जप्त केल्या. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, या मन्सूरभाईच्या टेबलात मन्सूर दौलत पटेल, हजरत अमीना फाऊंडेशन ट्रस्ट नावाचे व्हिजीटींग कार्डचा बंडलही होता. शिवाय मस्जिदे अमीना या नावाच्या 20 रुपये किंमत असलेले पावती पुस्तकही सापडले. त्यानंतर धार्मिक गेम सुरु झाला. या तलाठी कार्यालयाच्या ओसरीत एक दर्गा आहे. त्या दर्गाचा आधार घेत हा मन्सूरभाई हे सगळं करत असल्याचं त्याचं म्हणणं होतं, असा काहींचा आरोप होता.

मस्जिदे अमीना नावाचं पावती पुस्तकही त्यानं छापलं होतं. आलेल्या प्रत्येकाकडून काही ठरावीक रक्कम तो घेत असे. कोणताही दाखला घ्यायचा असला तरी, या मन्सूरभाई उर्फ आप्पाला पैसे द्यावे लागायचे. त्यातून तो काही रक्कम या मस्जिदे आमीना नावाच्या ट्रस्टला द्यायचा, असं काहींच म्हणणं आहे. गुरुवारी प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी हाकलून लावल्यानंतरही शुक्रवारी हा मन्सूरभाई थेट तलाठी सज्जात येऊन आतून कुलूप लावण्याचं धाडस कसं करु शकतो? हा प्रश्न सामान्यांनी विचारला. झिरो तलाठी असल्याचा आव आणणाऱ्या या मन्सूरभाईला कुणाचा आशीर्वाद आहे? सरकारी कार्यालयात बसून त्याचा जावई नेमकं काय करत होता?

हे प्रश्न सामान्यांना पडले आहेत. सामान्य शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांना अनेकदा दाखले लागतात. त्याच दाखल्यांसाठी अडवणूक करुन सामान्यांचा पैसा गोळा करुन तो अमिना मस्जिद ट्रस्टला देण्याचा हा प्रकार अगदीच धक्कादायक आहे. हे ट्रस्ट मिळालेल्या पैशाचा काय वापर करते? त्यातून काय काम करते? हे सगळं पोलिसांना शोधावं लागणार आहे. ज्या अर्थी हा मन्सूरभाई आमदारालाही मोजत नाही, त्याअर्थी हे एक मोठं रॅकेट आहे का, हा प्रश्नही सामान्यांना पडला आहे. या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button