Latest

अहिल्यानगरमध्ये चाललं काय? एकाच पोलीस ठाण्यातील तीन पोलीस लाचलुचपतच्या जाळ्यात

मंडळी अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील तब्बल तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेत. नितीन गाडगे, राजेश जाधव आणि दादाराम म्हस्के अशी या तिघांची नावे आहेत.

तक्रारदाराच्या भावाचा 1 जून रोजी अपघात झाला होता. त्यानंतर हे प्रकरण पुढील कारवाईसाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले.

अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी नितीन गाडगे यांच्याकडे होती. मात्र तक्रारदाराला पुढे राजेश जाधव यांच्याकडे पाठवण्यात आले. आरोपानुसार, गुन्हा दाखल करण्यासाठी सुरुवातीला 10 हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

त्यानंतर तडजोडीअंती ही रक्कम 7 हजार रुपयांवर आली. तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली आणि लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला.

कारवाईदरम्यान तक्रारदाराला पोलीस चालक दादाराम म्हस्के यांच्याकडे पाठवण्यात आले. म्हस्के यांनी सात हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि तक्रारदाराकडून लाच घेताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलं.

मंडळी, कायद्याचे रक्षण करणारेच जर लाचखोरीच्या आरोपात अडकत असतील, तर सामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. आता या प्रकरणात पुढे आणखी काय उघड होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button