
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पाण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मंडळी, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश दिलेत की, जिल्ह्यातील मोठी धरणे, मध्यम प्रकल्प आणि लघू सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी ३० सप्टेंबरपर्यंत लक्षात घेऊन काटेकोरपणे नियोजन केले जावे. विशेष म्हणजे पाणीसाठा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीत पाण्यासोबत चाऱ्याचाही प्रश्न चर्चिला गेला. जिल्ह्यातील पशुधनाला चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे नियोजन करावे, गावनिहाय आणि तालुकानिहाय चाऱ्याचा आढावा घ्यावा आणि जिल्ह्यातील चारा बाहेर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले.
याशिवाय, नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी टँकरमधून पुरवठा होणाऱ्या पाण्याची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पाण्याचे नमुने वेळोवेळी तपासले जातील आणि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष गावांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
ज्या गावांमध्ये पाणीपुरवठा योजना उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी टँकरचे पाणी थेट विहिरीत न टाकता विशेष प्लास्टिक टाक्यांमधून नागरिकांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच, संभाव्य दुष्काळ आणि पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.





