
नीट, जेईई किंवा एमएच-सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या एका योजनेतून विद्यार्थ्यांना अगदी मोफत कोचिंग, मोफत टॅब आणि दररोज ६ जीबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.
मंडळी, राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आणि डीटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती संस्थेने ही विशेष योजना सुरू केली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट, अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी एमएच-सीईटीची तयारी या योजनेतून करून दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे, देशातील कोचिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथील नामांकित संस्थेसोबत महाज्योतीने करार केला आहे. यात विद्यार्थ्यांना मोफत अँड्रॉइड टॅब, टॅबमध्ये अभ्यासक्रम, ई-बुक्स आणि लेक्चर्स उपलब्ध असतील. सोबतच दररोज ६ जीबी मोफत इंटरनेट डेटा विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
या योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, तो अकरावी विज्ञान शाखेत शिकत असावा आणि पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘रजिस्ट्रेशन फॉर जेईई, नीट आणि एमएच-सीईटी कोचिंग’ या लिंकवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. मंडळी, ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा.





