
अहिल्यादेवींच्या नगरीत नेमकं चाललं काय ? एका दिवसात तब्बल ११ बालविवाह लावण्याचा प्रयत्न… पण शेवटच्या क्षणी प्रशासनाने मोठी कारवाई करत हे सर्व विवाह थांबवले!
मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे. ३ मे २०२६ रोजी मोठी लग्नतिथी असल्याने जिल्ह्यात एकाच दिवशी ११ ठिकाणी बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती महिला व बालविकास विभागाला मिळाली.
यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाल करत विविध यंत्रणांच्या मदतीने ही कारवाई राबवली. नगर शहर, अकोले, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि श्रीरामपूर अशा ठिकाणी सुरू असलेले बालविवाह थांबवण्यात आले.
या मोहिमेत पोलीस, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, चाइल्ड हेल्पलाइन आणि बालसंरक्षण विभागाने एकत्र येत मोठी भूमिका बजावली. योग्य वेळी मिळालेल्या माहितीमुळे ११ अल्पवयीन मुला-मुलींचं आयुष्य अक्षरशः वाचलं.
मंडळी, आजही आपल्या समाजात बालविवाहासारखी गंभीर समस्या अस्तित्वात आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलं आहे. पण त्याचवेळी प्रशासनाची सतर्कता आणि नागरिकांचा सहभाग असेल, तर अशा घटना रोखता येतात, हेही सिद्ध झालं आहे.





