
राज्य शासनाने राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे मात्र लाखो शेतकरी केवळ एका कागदपत्रामुळे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. हो, अगदी बरोबर ऐकताय तुम्ही, फार्मर आयडी ह्या एका कागदपत्रामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीतून वगळले जातील अशी भीती आहे.
खरे तर नगर जिल्ह्यातील जवळपास १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही. आता शासनाने कर्जमाफीसह विविध कृषी योजनांसाठी हा आयडी अनिवार्य केला आहे. जिल्ह्यात एकूण १० लाखांहून अधिक शेतकरी आहेत. त्यापैकी सुमारे ८७ टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे, मात्र उर्वरित १३ टक्के शेतकरी अजूनही नोंदणीपासून दूर आहेत.
पीक कर्ज, अनुदान, बियाणे, खते, कृषी अवजारे तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप ई-केवायसी आणि नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
कोपरगाव, अहिल्यानगर, नेवासा, शेवगाव आणि राहुरी तालुक्यांमध्ये नोंदणीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. दुसरीकडे अकोले तालुक्याने १०० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी पूर्ण केली आहे. म्हणूनच कर्जमाफीसह शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर फार्मर आयडी आताच काढून घ्या.





