
घरातून फक्त दोन मिनिटांसाठी बाहेर पडलेली १३ वर्षांची मुलगी अचानक गायब झाली… आणि संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं ! अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
१९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता ही मुलगी कुटुंबीयांना सांगून घराबाहेर पडली होती. काही मिनिटांत परत येणार असल्याचे तिने सांगितले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात आणि नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला.
रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू ठेवूनही मुलगी सापडली नाही. अखेर मुलीच्या आजीने सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सध्या सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि तांत्रिक माहितीची पडताळणी केली जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोणाकडेही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





