Latest

अहिल्यानगरात अंगावर काटा आणणारी घटना ! ४ वर्षांची मुलगी बिबट्याच्या तोंडात, बापाने पाहिलं अन बिबट्याशी भिडला, लेकीचा जीव वाचवला, पण…

चार वर्षांच्या मुलीला बिबट्या तोंडात पकडून ओढत नेत होता… पण एका वडिलांनी क्षणाचाही विचार न करता थेट बिबट्यावर झडप घातली. पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे ही थरारक घटना घडली. चार वर्षांची अवनी गुंजाळ आपल्या आईसोबत घराजवळ असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला आणि तिला तोंडात पकडून ओढत नेण्यास सुरुवात केली.

मुलीच्या आईने आरडाओरडा करताच तिचे वडील मनोज गुंजाळ घटनास्थळी धावत आले. आपल्या डोळ्यांसमोर मुलीला बिबट्या घेऊन जात असल्याचे पाहून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याशी झुंज दिली. धाडसी प्रयत्नांमुळे त्यांनी अवनीची सुटका करण्यात यश मिळवले.

मात्र संकट अजून संपले नव्हते. जखमी अवस्थेत मुलीला कडेवर घेऊन घराच्या दिशेने धावत असताना अंधारामुळे त्यांना समोरची खोल विहीर दिसली नाही. त्यामुळे बाप-लेक दोघेही विहिरीत पडले. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत दोघांना सुरक्षित बाहेर काढले. सध्या अवनी आणि मनोजवर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button