Latest

टरबुज कवडीमोल ! अवकाळी, युद्धामुळे भाव अवघ्या १० रुपयांवर, शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघेना..

काल ४० रुपये किलो… आणि आज फक्त १० रुपये! टरबुज शेतकऱ्यांवर मोठं संकट, अहिल्यानगरसह राज्यभरातील टरबुज उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडलेत. काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलोने विक्री होणारे टरबुज आज थेट १० ते १५ रुपयांवर आले आहे आणि अनेक ठिकाणी तर टरबुज फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून टरबुजाला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. उत्पादनही चांगले झाले. पण एकाच वेळी बाजारात मोठी आवक वाढल्याने दर कोसळले.यातच अवकाळी पावसाचा फटका बसला.

ग्राहकांची मागणी कमी झाली आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्यातीवरही परिणाम झाला. त्यामुळे स्थानिक बाजारात मालाचा ढीग साचला आहे.सध्या घाऊक बाजारात टरबुजाला फक्त ५०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. हा दर इतका कमी आहे की, शेतातून टरबुज तोडण्याचा मजुरी खर्च आणि बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही निघत नाही.

सर्वात मोठी अडचण म्हणजे, या पिकाला कोणतेही अनुदान नाही आणि पीकविम्यातही समावेश नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक सुरक्षा नाही. मालाला उठाव नसल्यामुळे अनेक ठिकाणी टरबुज फेकून देण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button