Latest

ऐन गर्मीत अघोषित शटडाऊन, दुरुस्तीच्या नावाखाली तासन्तास वीज गायब; नगरकर हैराण…

अहिल्यानगरमध्ये कडक उन्हाळ्याने नागरिक आधीच हैराण झाले आहेत आणि त्यात आता वारंवार गायब होणाऱ्या विजेमुळे नगरकरांचा संताप वाढू लागला आहे.

मंडळी, शहरात अधिकृत लोडशेडिंग नसल्याचं महावितरण सांगत असलं, तरी प्रत्यक्षात दुरुस्तीच्या नावाखाली तासन्तास वीज गायब राहत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक शटडाऊन घेतला जातो आणि नागरिकांना प्रचंड उकाड्यात अक्षरशः त्रास सहन करावा लागतो.

महावितरणच्या माहितीनुसार, मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सध्या सुरू आहेत. वीजवाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे तोडणे, वाकलेले पोल सरळ करणे, तारांचा ताण व्यवस्थित करणे आणि निकामी साहित्य बदलण्याचे काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र दुसरीकडे आणखी एक मोठं कारण समोर आलं आहे.. कंत्राटी कामगारांचा संप. एजन्सीची बिले थकल्यामुळे अनेक कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याचं महावितरणने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळात दुरुस्तीची कामे होत आहेत. जे काम काही मिनिटांत व्हायला हवं, तेच काम आता अर्धा तास ते एक तास चालत असल्यामुळे वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित राहत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात परिस्थिती यापेक्षाही आणखी गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button