
अहिल्यानगर जिल्ह्यात आधीच बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त असताना आता पट्टेरी वाघाचे संकटही उभे राहिले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शनिवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात देविदास माणिकराव टकले (४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
देवळाली गावाजवळ सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या रामलिंग नावाच्या वाघाने हा हल्ला केल्याची माहिती आहे.
१७ ऑक्टोबरपासून पाटोदा आणि आष्टी तालुक्यांच्या सीमावर्ती भागात या वाघाचा वावर असल्याचे समोर आले आहे. यामुळे अहिल्यानगरच्या सीमावर्ती गावांमध्येही चिंता वाढली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सुमारे १,१५० बिबट्यांचा वावर असून ९७० गावे बिबट्याप्रवण म्हणून घोषित आहेत. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता बिबट्यांसोबत वाघाचेही संकट निर्माण झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





