Explained

महाराष्ट्रातील ‘हे’ गाव चक्क राक्षसाची पूजा करतं! हनुमानाचं नाव घेणंही जिथे ‘पाप’ मानलं जातं!

मित्रांनो, संपूर्ण भारतात जिथं जिथं प्रभू श्रीरामांचं नाव घेतलं जातं, तिथं हनुमानाची पूजा ही होतेच. प्रत्येक गावात मारुतीरायाचं एक तरी मंदिर असतंच. पण, तुम्हाला कोणी सांगितलं की महाराष्ट्रात एक असंही गाव आहे, जिथे चक्क एका ‘राक्षसाची’ पूजा केली जाते, तर तुम्हाला खरं वाटेल का? नाही ना… पण हे खरंय. याच विषयावर आम्ही हनुमान जयंतीलाही एक व्हिडीओ केला होता. आता आम्ही याच गावावर हा दुसरा व्हिडीओ का करतोय, तर हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. आज आपण ज्या अनोख्या गावाची माहिती पाहणार आहोत, त्या गावात देवाची नाही, तर ‘निंबादैत्य’ नावाच्या एका दानवाची भक्ती केली जाते. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, या गावात हनुमानाचं एकही मंदिर नाही. इतकंच काय, तर या गावात कोणाचंही नाव मारुती, बजरंग किंवा हनुमान ठेवलं जात नाही.

इथपर्यंत तर ठीक होतं. पण काहींच्या मते, गावकऱ्यांची श्रद्धा इतकी कट्टर आहे की या गावात ‘मारुती’ कंपनीची चारचाकी गाडीही कोणी खरेदी करत नाही. आणि जर बाहेरगावाहून कोणी ‘मारुती’ किंवा ‘बजरंग’ नावाचा मुलगा लग्नासाठी स्थळ म्हणून आला, तर त्याला या गावात मुलगीही दिली जात नाही. आता आत्ता २१ व्या शतकात हे सगळं अतिशयोक्ती वाटतं, पण यातील काही चालीरीती अगदी अलिकडच्या काळापर्यंत होत्या. आता नेमकं काय आहे या गावाचं रहस्य? एका राक्षसाला देवत्व कसं मिळालं? आणि हनुमानाशी या गावाचं वैर का आहे?

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका. त्याच गावात आहे, निंबा दैत्यनांदूर. भगवानगडाच्या भव्य डोंगररांगांच्या कुशीत लपलेलं हे गाव. बाहेरून पाहिलं तर महाराष्ट्रातील इतर कोणत्याही गावासारखंच साधं, शांत. पण जसं तुम्ही या गावाच्या वेशीवर पाऊल ठेवता, तसं इथलं वातावरण बदलतं. इथे तुम्हाला रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या काचांवर ‘जय श्रीराम’ किंवा ‘जय बजरंगबली’ लिहिलेलं दिसणार नाही. इथं ट्रॅक्टरवर, गाड्यांवर किंवा अनेक ठिकाणी एकच नाव कोरलेलं दिसतं—’निंबादैत्य प्रसन्न!’ असं का, तर इथला राजा आहे निंबादैत्य हा राक्षस.

असं काय घडलं होतं या मातीत, ज्यामुळे एका दानवाला देवाचं स्थान मिळालं आणि बजरंगबलीला या गावातून हद्दपार व्हावं लागलं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला हजारो वर्षे मागे, थेट त्रेतायुगात जावं लागेल. आज ज्याला आपण पाथर्डी म्हणतो, तो परिसर तेव्हा घनदाट आणि भयावह ‘दंडकारण्य’ म्हणून ओळखला जायचा. या जंगलात पाऊल ठेवायची कुणाचीही हिम्मत नसायची. कारण इथला अनभिषिक्त सम्राट होता—निंबादैत्य! एक महाबलाढ्य, क्रूर आणि अजिंक्य राक्षस.

याच महाबली राक्षसाचा एकदा महाबली हनुमानाशी सामना झाला. आता हा सामना का आणि कसा झाला, याचीही एक कथा सांगितली जाते. कथा अशी आहे की, रावणावर विजय मिळवून श्रीराम लंकेहून सीतेला अयोध्येला घेऊन आले. परंतु एका विचित्र कारणाने त्यांना सीतेला पुन्हा जंगलात पाठवावे लागणार होते. तेव्हा ही जबाबदारी त्यांनी हनुमंतावर सोपविली. हनुमंत व सीता येथील दंडकारण्यात असलेल्या काशी केदारेश्वरला म्हणजेच आत्ताच्या पाथर्डी तालुक्यात आले. याच पाथर्डी तालुक्यात निंबादैत्य राक्षसाचे वास्तव्य होते. सीतामातेसाठी फळे शोधण्यासाठी हनुमंतराया जंगलात शिरले.

परवानगी न घेता आपल्या राज्यातील संपत्तीची कोणीतरी चोरी करत आहे, हे निंबादैत्याच्या लक्षात येते. त्याला राग येतो व तो हनुमंताला युद्धासाठी आव्हान देतो. हनुमंतही गदा घेऊन त्या निंबादैत्यावर चाल करतो. यावेळी या दोघांमध्ये घनघोर युद्ध होते. त्यात दोघेही जखमी होतात; परंतु कोणीही पराभूत होत नव्हते. एका क्षणी जखमी अवस्थेतील निंबादैत्य श्रीरामांचा धावा करतो. आपल्या परमेश्वराचे नाव निंबादैत्याच्या मुखातून ऐकल्यावर हनुमंत आश्चर्यचकित होतो. त्याचवेळी निंबादैत्याचा धावा ऐकून श्रीराम प्रकट होतात.

श्रीरामांनी निंबादैत्याच्या शरीरावरून हात फिरविल्यानंतर त्याच्या अंगावरील जखमा पूर्णपणे बऱ्या होतात. निंबादैत्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीराम त्याला वर देतात, ‘यापुढे या गावात हनुमंताचे नावही घेतले जाणार नाही. येथे फक्त तुझीच पूजा होईल.’ तेव्हापासून या गावात फक्त निंबादैत्य हाच राजा आहे. आणि हनुमंताने त्याच्याशी युद्ध केल्यामुळे या गावात हनुमंतरायाची पूजा केली जात नाही. गावातील नदीच्या किनाऱ्यावर असलेले निंबादैत्य मंदिर दगडी बांधकामाचे असून ते १६ व्या शतकातील असावे, असे सांगितले जाते. सभामंडप व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गर्भगृहात निंबादैत्याची दगडी मूर्ती आहे. उत्सवाच्या वेळी याला चांदीचा मुकुट व अलंकार परिधान केले जातात.

पण याच कथेनंतर काही नियम या गावातील गावकऱ्यांनी वर्षानुवर्षे पाळलीत. गावात कुणाचंही नाव मारुती, हनुमंत ठेवलं जात नाही, गावातील मुलीही या नावाच्या मुलाला दिल्या जात नाहीत. गावात मारुती कंपनीची गाडीही कुणी घेत नाही अशा अनेक कथा त्यानंतर बातम्या किंवा प्रसारमाध्यमांवर आल्या. अर्थात त्यातील काही खऱ्याही आहेत. याच कथांसोबत आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे या गावात दुमजली बांधकाम किंवा घर कुणीच बांधत नाही. आता या कथेतील सर्वात मोठा विरोधाभास बघा. साधारणपणे जेव्हा आपण ‘राक्षस’ किंवा ‘दैत्य’ म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर बळी, मद्य किंवा मांसाहाराचा नैवेद्य येतो.

पण निंबादैत्य महाराज याला अपवाद आहेत! ते शुद्ध शाकाहारी आहेत. रोज दुपारी बरोबर १२ वाजता गावातील एका घरातून महाराजांसाठी गरमागरम पुरणपोळीचा नैवेद्य येतो. आणि दरवर्षी गुढीपाडव्याला इथे असा काही जल्लोष असतो की जणू काही दिवाळीच! जगात कुठेही असलेला या गावाचा माणूस पाडव्याला निंबादैत्याच्या चरणी माथा टेकवायला येतोच. इथे कुस्त्यांचे फड रंगतात, पालखी निघते आणि ‘निंबादैत्य महाराज की जय’ या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो.

आपण बाहेरच्या जगात देव आणि दानव यांच्यात एक मोठी भिंत उभी केली आहे. पण या गावाने आपल्याला शिकवलं की, भक्ती ही जात, कुळ किंवा रूप पाहत नाही. जर तुमची भक्ती खरी असेल, तर खुद्द देवालाही एका राक्षसापुढे झुकावं लागतं. बाहेरच्या लोकांसाठी या गावाचे नियम कदाचित ‘अंधश्रद्धा’ असतील… पण या गावकऱ्यांसाठी ती त्यांच्या पूर्वजांनी दिलेली ‘जबाबदारी’ आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी या गावाला गेला आहात का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button