मित्रांनो… काही घटना अशा असतात, ज्यांचे धागेदोरे जितके सोडवण्याचा प्रयत्न करावा, तितके ते अधिकच गुंतत जातात. प्रत्येक पावलावर एक नवीन संशय निर्माण होतो आणि तपासाची दिशा पूर्णपणे बदलून जाते.
अशीच एक थरारक आणि तितकीच गूढ घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडली. एक अशी घटना, जिच्या सुरुवातीला पोलिसांना वाटलं की ही केवळ दागिन्यांच्या हव्यासापोटी केलेली एक लुटमार आहे. त्यानंतर तपासाची सुई एका सरकारी कर्मचाऱ्याकडे वळली, त्याला चौकशीसाठी ताब्यातही घेतलं गेलं. पण या संपूर्ण तपासाला एक अनपेक्षित वळण दिलं ते दोन गोष्टींनी… एक म्हणजे
पोलीस दलातील ‘ब्रह्मा’ नावाच्या श्वानाने काढलेला माग, आणि दुसरं म्हणजे मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या एका मुलीचा फोन कॉल!
नेमकं काय घडलं होतं संगमनेरच्या खंडेरायवाडीत? गायी चारण्यासाठी रानात गेलेली एक कष्टाळू महिला अचानक बेपत्ता कशी झाली? तिचा मृतदेह खोल दरीत कोणी नेला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तपासात समोर आलेल्या ‘त्या’ पाच धक्कादायक प्रश्नांची उत्तरं पोलीस कशी शोधत आहेत? आजच्या या व्हिडीओमध्ये आपण या संपूर्ण गूढ प्रकरणाचा अगदी बारीक-सारीक तपशील पाहणार आहोत.
ही घटना आहे, संगमनेर तालुक्यातील पठारभागातील खंडेरायवाडीची. तेथेच चाचणवस्ती आहे. इथे मनीषा रामनाथ चाचण या आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. घरासाठी अहोरात्र कष्ट करणारी, साधी आणि मेहनती महिला म्हणून परिसरात त्यांची ओळख होती. दिवस होता बुधवार, तारीख १८ नोव्हेंबर २०२६. नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजेच्या सुमारास मनीषा या आपल्या गायी चारण्यासाठी घराबाहेर पडल्या आणि रानात गेल्या. दुपारचे दोन वाजले, तीन वाजले, चार वाजले… हळूहळू संध्याकाळ होऊ लागली. सूर्य मावळतीला झुकला, पण रानात गेलेल्या मनीषा काही घरी परतल्या नाहीत.
संध्याकाळी पाच वाजेनंतर घरात आणि गावात एकच चलबिचल सुरू झाली. त्यांचे पती रामनाथ चाचण आणि गावकऱ्यांनी आजूबाजूच्या परिसरात, शेतात, रानात त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण मनीषा यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर, काहीतरी अघटित घडल्याच्या भीतीने पती रामनाथ चाचण यांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या पत्नीला पळवून नेल्याची, म्हणजेच अपहरणाची तक्रार त्यांनी पोलिसांत दाखल केली. पोलिसांनीही तात्काळ गुन्हा दाखल करत रात्रीपासूनच बेपत्ता महिलेचा शोध सुरू केला. पण रात्र सरली तरी मनीषा सापडल्या नाहीत. कोणालाही कल्पना नव्हती की दुसऱ्या दिवशी सकाळी या गावावर दुःखाचा डोंगर कोसळणार आहे.
दुसरा दिवस उजाडला. गुरुवार, १९ नोव्हेंबर. सकाळच्या सुमारास गावातील काही तरुण खंडेरायवाडीपासून अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या साकूरदरा परिसरात गेले होते. तिथे एका ठिकाणी या तरुणांना जमिनीवर रक्ताचे ताजे डाग दिसले. संशय आल्याने त्यांनी आजूबाजूला आणि खाली खोल दरीत डोकावून पाहिलं… आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली! साकूरदरा येथील खोल दरीत एका महिलेचा मृतदेह निपचित पडलेला होता. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. खात्री केली असता, तो मृतदेह बेपत्ता असलेल्या मनीषा चाचण यांचाच होता.
दगडाने ठेचून त्यांचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि घारगावचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आपल्या संपूर्ण फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला. तिथे रक्ताने माखलेले दगड, फुटलेल्या बांगड्या, स्कार्फ, पिशवी, जेवणाचा डबा आणि मनीषा यांचा मोबाईल फोन पडलेला आढळला. पण पोलिसांनी जेव्हा मृतदेहाची पाहणी केली, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात आली… मनीषा यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब होते…
मित्रांनो, इथूनच या केसमध्ये अनेक वळणं यायला सुरुवात झाली. अंगावरील दागिने गायब असल्याने, सुरुवातीला पोलिसांना आणि गावकऱ्यांना हा प्रकार लुटमारीचा वाटला. ‘रानात एकटी महिला पाहून चोरट्यांनी दागिन्यांच्या हव्यासापोटी तिचा खून केला असावा,’ असा प्राथमिक अंदाज बांधला गेला. पण घारगाव पोलीस इतक्या सहज कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणारे नव्हते. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी मनीषा यांचा भूतकाळ, त्यांचे कोणाशी वाद होते का, किंवा कोणाशी ओळख होती का, याचा तपास सुरू केला. या तपासात पिंपळगाव देपा येथील एका ओळखीच्या वनरक्षकाचे नाव समोर आले.
या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या काही स्थानिक बातम्यांच्या आधार घेतला तर, त्या वनरक्षकाची आणि मनीषा यांची जुनी ओळख होती आणि काही कारणावरून यापूर्वी त्यांच्यात वादही झाले होते. त्यामुळे संशयाची सुई थेट त्या वनरक्षकाकडे वळली. पोलिसांनी वेळ न घालवता त्या वनरक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सगळ्यांना वाटलं की गूढ उकललं! पण जेव्हा पोलिसांनी त्या वनरक्षकाच्या मोबाईल लोकेशनचे आणि कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण केले, तेव्हा वेगळंच सत्य समोर आलं.
घटनेच्या दिवशी दुपारी साडेबारा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत तो वनरक्षक प्रथम संगमनेर शहरात होता आणि तिथून तो थेट आपल्या गावी परतला होता. या घटनेशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे तांत्रिक पुराव्यांवरून स्पष्ट झाले आणि पोलिसांनी चौकशीनंतर त्याला सोडून दिले.
आता पोलिसांसमोर मोठा प्रश्न होता—जर ही चोरी नव्हती आणि त्या वनरक्षकाचाही यात संबंध नाही, तर मग हे कृत्य केलं कोणी? या तपासात महत्त्वाचा धागा दिला पोलीस दलातील ‘ब्रह्मा’ या तपास श्वानाने. फॉरेन्सिक टीमसोबत घटनास्थळी आलेल्या ‘ब्रह्मा’ या श्वानाला खुनासाठी वापरण्यात आलेल्या दगडाचा वास देण्यात आला. तो वास घेत ‘ब्रह्मा’ दरीतून बाहेर आला आणि थेट चालत जाऊन थांबला… मनीषा यांच्याच घरासमोर… ब्रह्माच्या या इशाऱ्याने तपासाची दिशा बदलली आणि संशयाची सुई घरातील व्यक्तींकडे वळली.
पोलिसांनी घरातील सर्वांच्या हालचाली तपासण्यास सुरुवात केली आणि पती रामनाथ चाचण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी आपला या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. मात्र, तांत्रिक तपासात समोर आलेल्या काही गोष्टींमुळे पोलिसांच्या मनात अनेक संशय आणि प्रश्न निर्माण झाले आहेत.
मित्रांनो, हे नेमके प्रश्न कोणते आहेत, ज्यांची उत्तरे पोलीस सध्या शोधत आहेत? ते नीट ऐका…
प्रश्न पहिला—
मनीषा यांची मुलगी मुंबई पोलीस दलात कार्यरत असल्याचे समजते. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता, मनीषा यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलीला एक फोन गेला होता, पण तो उचलला गेला नाही. काही वेळाने मुलीने आईला परत फोन लावला, तेव्हा फोन एकदा वाजून कट झाला आणि त्यानंतर ‘स्वीचऑफ’ झाला! काळजी वाटल्याने मुलीने लगेच वडील रामनाथ यांना फोन केला आणि आईबद्दल विचारलं. त्यावर रामनाथ यांनी ‘ती गेलेली आहे कुठेतरी, मिळून आलेली नाही…’ असं उत्तर दिल्याचं तपासात समोर आलं आहे. आता पोलिसांसमोर प्रश्न हा आहे की, मनीषा बेपत्ता झाल्याची चर्चा गावात संध्याकाळी पाच वाजेनंतर सुरू झाली, मग दुपारी साडेतीन वाजताच रामनाथ यांना पत्नी ‘मिळून येत नाहीये’ याची माहिती कशी होती?
प्रश्न दुसरा—
संध्याकाळी जेव्हा गावकरी मनीषा यांचा शोध घेत होते, तेव्हा रामनाथ यांनी काही ग्रामस्थांना सांगितलं की, ‘ती दरीत पडल्याचे एका बुवाने आपल्याला सांगितले आहे!’ प्रत्यक्षात शोध सुरू होण्यापूर्वीच त्यांना ‘दरी’चा उल्लेख कसा सुचला? या प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत आहेत.
प्रश्न तिसरा—
तांत्रिक तपासात असं दिसून आलं की, बुधवारी दुपारी रामनाथ साकूर फाट्यावर गेले होते आणि दुपारी एक ते दोन या वेळेत त्यांचा मोबाईल ‘स्वीचऑफ’ होता. शवविच्छेदन अहवालानुसार, मृत्यूची संभाव्य वेळही याच दरम्यानची असल्याचा अंदाज आहे. हा केवळ योगायोग आहे की यामागे काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.
प्रश्न चौथा—
दुपारी साडेतीन वाजता मनीषा यांच्या मोबाईलचं लोकेशन कन्हेर पोखरी परिसरात दिसत होतं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो मोबाईल साकूरदरा येथील मृतदेहाजवळ आढळून आला. तो मोबाईल तिथे कसा पोहोचला?
प्रश्न पाचवा—
मृतदेहावरील सोन्याचे दागिने नेमके कोणी आणि का काढून घेतले? तपासाची दिशा भटकवण्यासाठी हा बनाव रचला गेला होता का?
या सर्व तांत्रिक बाबी, ‘ब्रह्मा’ श्वानाने दाखवलेला माग आणि समोर आलेल्या या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलिसांनी संशयाच्या आधारे पतीसह दोघांची चौकशी केली आहे. न्यायालयाकडून त्यांची पोलीस कोठडी घेऊन या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न घारगाव पोलीस करत आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे—पोलीस तपासात समोर आलेला संशय, तांत्रिक पुरावे आणि न्यायालयात सिद्ध होणारा गुन्हा या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
रामनाथ चाचण यांनी प्राथमिक चौकशीत हे आरोप अमान्य केले आहेत. त्यामुळे या घटनेमागे नेमकं कोण आहे, हे कोठडीतील सखोल चौकशी आणि तपासानंतरच स्पष्ट होईल. एका कष्टाळू महिलेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण संगमनेर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घारगावचे पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे आणि त्यांचे पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करत आहेत.





