
अहिल्यानगरमध्ये खाकीवर मोठा डाग लागलाय… अवघ्या १५ दिवसांत चार पोलिस हवालदार लाच घेताना पकडले गेले आहेत… नेमकं काय चाललंय पोलिस यंत्रणेत? पाहा हा रिपोर्ट…
अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिस यंत्रणेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या खाकीवरच भ्रष्टाचाराचे सावट गडद होताना दिसत असून, मागील पंधरा दिवसांत चार पोलिस हवालदारांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे पोलिस दलातील गैरप्रकार उघडकीस येत आहेत.
१५ ते २९ एप्रिल दरम्यान सलग कारवायांमध्ये हे प्रकरणे समोर आली. काही ठिकाणी आरोपींना मदत करण्यासाठी थेट पैशांची मागणी करण्यात आली, तर काही प्रकरणांत अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी लाच घेतल्याचे उघड झाले. एका प्रकरणात तर आरोपीला मदत करण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पत्त्याचा अड्डा सुरू ठेवण्यासाठी हवालदाराने लाच घेतल्याचे प्रकरण उघड झाले. त्यानंतर पाथर्डी येथे अपघाताच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन वाहतूक पोलिसांनी पाच हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. या सर्व घटनांमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.





