Latest

फ्लॅटसाठी १२ लाखांची मागणी; अहिल्यानगरच्या डॉक्टर महिलेची आत्महत्या, तिघांवर गुन्हा

पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे हुंड्यासाठी होत असलेल्या छळामुळे एका तरुण डॉक्टर महिलेने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. गौरी चौरे हिने बीएचएमएसचे शिक्षण पूर्ण केले होते. तिचा विवाह अमित दळवी याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही महिने सर्व काही सुरळीत होते. गौरी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती, तर पती अमित ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत होता.

मात्र, काही काळानंतर मुंबईत फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरहून १२ लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आली. गौरीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अशी रक्कम देण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही तिचा छळ सुरूच राहिला. तिने ही बाब आपल्या कुटुंबीयांना सांगितली होती.

२७ एप्रिल रोजी पतीने तिला गोरेगाव येथे सोडले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी घराला कुलूप लावून मुंबईला गेल्याचे समजले. या प्रकारामुळे गौरी मानसिक तणावात गेली. कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही ती नैराश्यात होती.

शेवटी सततच्या छळाला कंटाळून शनिवारी (ता. २) सकाळी साडेसातच्या सुमारास तिने घरातील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी पती अमित दळवी, सासू संगीता दळवी आणि सासरे बाळासाहेब दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button