Explained

नगरला 5 वर्षांत मिळणार 475 कोटी रुपये; पण कसे? आणि कशासाठी?

महाराष्ट्रात रिक्त झालेल्या बारामती व राहुरी पोटनिवडणुकीच्या आमदारांचा काल शपथविधी झाला. आपल्या वडिलांसारखा पेहराव करत, मंगळवारी राहुरीचे नूतन आमदार अक्षय कर्डिले यांनी विधानसभेत शपथ घेतली. अक्षय कर्डिलेंच्या रुपाने नगरला १९ वा आमदार मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्याने तब्बल १९ आमदार देत, राज्यात एक अनोखा विक्रम केलाय. या १९ आमदारांचा प्रत्येकी पाच कोटी असा नगरला आता तब्बल ९५ कोटी रुपये निधी मिळणार आहेत. जे नगरच्या राजकीय इतिहासात कधीच घडलं नाही, ते आता घडणार आहे. पुढच्या पाच वर्षांत, दरवर्षी ९५ कोटी रुपये मिळणार असल्याने नगरचा रखडलेला विकास आता तरी होईल, असं म्हणायला काही हरकत नाही. नगरच्या विकासाच्या आकड्यांचं हेच गणित आज आपण समजून घेणार आहोत…

उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले, यांच्या निधनामुळे बारामती व राहुरी विधानसभेच्या जागा रिक्त झाल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी या दोन्ही जागांची निवडणूक झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे वंशपरंपरागत नेत्यालाच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अक्षय कर्डिले यांनी शपथ दिली. या शपथविधीचीही नगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली. वडील दिवंगत शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना नूतन आ. अक्षय कर्डिले यांनी उजाळा दिला. डोक्यावर गांधी टोपी, अंगात पांढरा नेहरू कुर्ता, पायजमा आणि डोक्यावर बुक्का अशा वडिलांच्या आवडत्या वेशातच अक्षय कर्डिले यांनी विधानसभेची शपथ घेतली. अक्षय कर्डिलेंच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि त्यांची विश्वासपूर्ण देहबोली स्व. शिवाजीराव कर्डिलेंची आठवण करुन गेली.

नगर जिल्ह्यात विधानसभेचे बारा आमदार आहेत. त्यात शिर्डीतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे, संगमनेरमधून अमोल खताळ, कोपरगावमधून आशुतोष काळे, अकोल्यातून डाँ. किरण लहामटे, राहुरीतून अक्षय कर्डिले, श्रीरामपूरमधून हेमंत ओगले, नेवाशातून विठ्ठल लंघे, शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, श्रीगोंद्यातून विक्रमसिंह पाचपुते, पारनेरमधून काशिनाथ दाते, आणि नगर शहरातून संग्राम जगताप यांचा समावेश आहे.

या १२ आमदारांशिवाय, कर्जत जामखेडमधून सभापती प्रा. राम शिंदे, श्रीगोंद्याचे अमित गोरखे, जामखेडचेच सुनील कर्जतकर, कोपरगावचे विवेक कोल्हे, पाथर्डीचे शिवाजीराव गर्जे, संगमनेरचे सत्यजित तांबे आणि राहुरीचे प्राजक्त तनपुरे यांना विधानपरिषदेवर संधी मिळालेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच कर्जत-जामखेड मतदारसंघातून यावेळी तीन जणांना आमदार होण्याची संधी मिळालीय. याशिवाय पाथर्डी, कोपरगाव, राहुरी, श्रीगोंदा, संगमनेर या पाच तालुक्यांतही प्रत्येकी दोन जणांना आमदार होण्याचं भाग्य लाभलंय. विधानसभेचे बारा आणि विधानपरिषदेचे सात असे, तब्बल १९ आमदार सध्या नगर जिल्ह्यात आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा व विधान परिषद सदस्यांना मिळणारा विकासनिधी पाहिला तर, एकट्या नगर जिल्ह्यात वर्षाला ९५ कोटी रुपये येणार आहेत. विधानसभा व विधान परिषद सदस्याला नव्या विकासनिधीनुसार दरवर्षी प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळतात. म्हणजेच, पुढची पाच वर्षे नगरला दरवर्षी ९५ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळणार आहे. म्हणजेच, कर्जत-जामखेड तालुक्याला दरवर्षी १५ कोटी, तर पाथर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहुरी आणि श्रीगोंदा या तालुक्यांना दरवर्षी १० कोटींचा विकासनिधी मिळणार आहे.

इतर सात तालुक्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये विकासनिधी मिळणार आहे. या विकासनिधीतून त्या-त्या तालुक्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, अशा शक्यता व्यक्त करण्यात आता हरकत नाही. कारण एकेका तालुक्यात दोन-दोन, तीन-तीन आमदार म्हटल्यावर विकासनिधी कुठे आणि कसा खर्च करायचा, हा प्रश्न आमदारांना पडावा, अशी सामान्यांची इच्छा आहे.

२०११ पासून २०२० पर्यंत आमदारांना दरवर्षी दोन कोटींचा विकासनिधी मिळत होता. त्यानंतर २०२० या वर्षी आमदारांच्या विकासनिधीत एक कोटींची वाढ करण्यात आली. त्यावर्षी आमदारांना तीन कोटींचा विकासनिधी मिळाला. त्याचवर्षी दिवाळी-दसऱ्याचे औचित्य साधून ऑक्टोंबर २०२० मध्ये आमदारांच्या निधीत पुन्हा एक कोटींची वाढ जाहीर करण्यात आली. २०२१ व २०२२ या वर्षात आमदारांना ४ कोटींचा विकासनिधी मिळाला. परंतु २०२२ पासून तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना प्रत्येकी पाच कोटींचा विकासनिधी देण्यास सुरुवात केली.

म्हणजेच एका आमदाराला त्याचा कार्यकाळ पूर्ण करेपर्यंत आपल्या मतदारसंघासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपये मिळतात. हाच हिशोब पाहिला तर, नगर जिल्ह्याला पुढच्या पाच वर्षात थोडे न थिडके ४७५ कोटी रुपये मिळतील. देशातील कोणत्याच जिल्ह्याला आजपर्यंत आमदारांच्या माध्यमातून एवढा विकासनिधी मिळालेला नाही. नगर जिल्ह्याने हा एक प्रकारे विक्रमच केला आहे. फक्त या निधीतून नगरचा विकास होईल का? हाच काय तो प्रश्न आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे रेल्वे, सिंचन आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प सध्या अपूर्ण आहेत. निधीचा अभाव आणि भूसंपादनातील अडचणींमुळे या प्रकल्पांना उशीर झाला आहे. नदीजोड प्रकल्प, निळवंडे प्रकल्पाचे उजवे कालवे, नगर-संभाजीनगर सहापदरी मार्ग, नगर-मनमाड महामार्ग, शिर्डी-शिंगणापूर रस्ता, दुष्काळी पाणी योजना, नगर शहरातील उड्डाणपूल, तसेच नगर-संभाजीनगर व नगर-मनमाड मार्गावरील उड्डाणपूल, संभाजीनगर-अहिल्यानगर रेल्वेमार्ग, हरेगाव इंधन प्रकल्प, साकळाई योजना, मुळा-भंडारदरा धरणात साचलेला गाळ, असे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळले आहेत. हे सगळे पुढच्या पाच वर्षांत सुटावेत, अशी नगरकरांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button