
संगमनेरच्या राजकारणात सध्या एका कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. शहरातील नव्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या लोकार्पण कार्यक्रमात आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जाहीर आभार मानले.
सीसीटीव्ही यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आणि त्यासाठी विखे पाटील यांनी सहकार्य केल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं. मात्र, या कामाचं श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी नाव न घेता विरोधकांना सुनावलं.
हा निधी कोणाच्या वैयक्तिक शिफारशीमुळे नव्हे, तर नगरपालिकेच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळतो, असंही तांबे यांनी सांगितलं. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेसाठी उभारलेली ही यंत्रणा महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात संभाव्य राजकीय आघाडीच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्यामुळे तांबेंच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.





