
नेवासा तालुक्यातील त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठानचे सचिव मनीष घाडगे हे मंगळवारी जळालेल्या अवस्थेत आढळले. संस्थेतील त्यांच्या कार्यालयाला आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. त्यांच्या कार्यालयाचे दोन्ही दरवाजे आतून बंद असल्याने चर्चांना उधान आले. त्यांनी आत्महत्या केली की या आगीला अन्य काही कारण आहे, हा तपास आता सुरु झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठानणच्या खडका फाटा येथील कार्यालयात मनीष घाडगे यांच्या ऑफीसमधून धूर व आग दिसून आली. सुरक्षारक्षकांनी तातडीने कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा मनीष घाडगे हे भाजलेल्या अवस्थेत आढळले.
घटनेनंतर त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांनी अहिल्यानगरला हलविले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचा जबाब घेतल्यानंतर पुढील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्रिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगे यांच्या निधनानंतर संस्थेच्या कारभारात अनेक बदल झाले आहेत.
काही दिवसांपासून संस्थेतील प्रशासकीय निर्णय, अधिकार वाटप व व्यवस्थापनातील मतभेदांमुळे अंतर्गत तणाव असल्याचेही बोलले जात आहे. तेथील एका जबाबदार व्यक्तीने हे टोकाचे पाऊल उचलले का? उचलले असेल तर त्याचे कारण काय? या चर्चा सुरु झाल्या आहेत. पोलिसांनी जबाबा घेतल्यानंतरच याबाबत माहिती कळेल, असे सांगितले आहे.





