
श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्याकांडात आरोपी कृष्णा अरुण शिनगारेच्या जामीन अर्जाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. जामिनाचा निर्णय अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नसल्याने या प्रकरणातील पेच कायम आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बुधवारी न्यायमूर्ती हितेन एस. वेणगावकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी माहितीदारांच्या वकिलांनी जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी वेळ मागितला.
विशेष म्हणजे, जामीन अर्जासंदर्भातील आदेशावर अद्याप न्यायमूर्तींची स्वाक्षरी झालेली नाही. तसेच हा आदेश न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोडही करण्यात आलेला नाही. त्यामुळे माहितीदारांना आपली बाजू मांडण्याची संधी देत न्यायालयाने १ ऑक्टोबर रोजी प्रकरण पहिल्या क्रमांकावर ठेवले आहे.
महत्त्वाचं म्हणजे, आजच्या सुनावणीनंतर कोणत्याही कारणास्तव पुढील तहकूब दिली जाणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमका काय निर्णय होणार? कृष्णा शिनगारेच्या जामिनाचा मार्ग मोकळा होणार की नवा पेच निर्माण होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.





