Explained

Rohit Pawar यांनी Ram Shinde यांच्या अडचणी वाढवल्या; १ कोटींच्या गांजा तस्करीचं प्रकरण काय?

कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवारांनी रविवारी नगरकरांसह महाराष्ट्राची झोप उडवली. त्यांच्या एका गंभीर आरोपानं राजकारणात खळबळ उडाली. भाजप अल्पसंख्यांक सेलचा प्रदेश उपाध्यक्ष व कर्जत तालुक्यातील राशीनचा रहिवाशी असलेल्या, साहिल काजी याला गांजा तस्करीच्या आरोपात अटक झाली. विशेष म्हणजे ओडिसा राज्यातील पोलिसांनी ही कारवाई केली. हाच साहिल काजी, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचं आ. रोहित पवारांचं म्हणणं होतं. याच तस्करीतून कमविलेल्या काळ्या पैशाचा वापर, अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी होत असल्याची शंका, आ. रोहित पवारांनी व्यक्त केली. शिवाय सभापती प्रा. राम शिंदे हे याच साहिल काजीला वाचविण्यासाठी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक आरोपही आ. रोहित पवारांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये केला. ही पोस्ट नगरसह राज्यभर व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा रंगल्या. ओडीसा राज्यातून, अहिल्यानगरला गांजाची तस्करी होते, हे यापूर्वीही अनेक कारवायातून समोर आले होते. नगरचा सर्पमित्र व रिलस्टार आकाश जाधवलाही फेब्रुवारी महिन्यांत याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. परंतु आता थेट एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे या प्रकरणाच्या चर्चा वाढल्या. ओडीसातील गांजा तस्करीचं हे नेमकं प्रकरण काय?

तीन आमदार असलेल्या कर्जत-जामखेडचं राजकारण नेहमी तापलेलं असतं. विधानसभेचे आ. रोहित पवार व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यातील वादामुळे या मतदारसंघात एकमेकांविरोधात कायम आरोप होतात. असाच एक आरोप, रविवारी आ. रोहित पवारांनी केला. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन आ. पवारांनी काही फोटो व एफआयआर काँपीसह एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका भाजपच्या पदाधिकाऱ्याचा कारनामा मांडला होता. साहिल काजी या भाजपच्या अल्पसंख्यांक सेलच्या युवा उपाध्यक्षाविरोधात, दाखल तक्रारीची काँपी त्यांनी व्हायरल केली होती. या साहिल काजीला ओडीसा पोलिसांनी २९ जूनला अटक केली. महागड्या कारमधून ओडीशातून महाराष्ट्रात गांजा घेऊन येताना, साहिलसह चार जणांना ओडीशा पोलिसांनी पकडले होते. भाजपचा पदाधिकारी, त्यात सभापती प्रा. राम शिंदेंचा सहकारी असलेल्या साहिलविरोधातील एफआयआर काँपीच आ. रोहित पवारांनी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी अनेक गंभीर आरोप केले. आता ही एफआयआर काँपी काय होती, ते समजून घेऊ…

पोस्ट केलेली काँपी ही, पोलिस उपनिरिक्षक भोलानाथ पांडा यांची होती. पांडा हे ओडीशा राज्यातील बामुनीगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तेच या गुन्ह्याचे फिर्यादी आहेत. दाखल फिर्यादीनुसार, पांडा हे १९ जूनला आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी जिंझिरीगुडा गावाजवळ त्यांना एक काळ्या रंगाची किया कंपनीची कार, संशयास्पद जाताना दिसली. या कारचा क्रमांक होता, एमएच १२ एक्सएक्स ७११६. पांडा व त्यांच्या टीमने संशयावरुन ही कार सकाळी साडेदहाच्या सुमारास कदंब ढाका गावाजवळ अडवली. तपासाअंती या गाडीत चार जण होते. ते सगळे महाराष्ट्रातले होते. शिवाय या गाडीच्या मागच्या सिटवर, एका गोणीत गांजा भरलेला दिसला. ओडीशा पोलिसांनी पंचासमक्ष या सगळ्या प्रकाराचा पंचनामा केला. पोलिसांनी या चारही जणांना ताब्यात घेतले. त्यात दिनेश सोपान काळे (रा. सालसे, ता. करमाळा), साहिल अल्लाउद्दीन काजी (रा. राशीन, ता. कर्जत), समीर शब्बीर मुलानी (रा. राशीन, ता. कर्जत) आणि अभिजीत अनील मोरे (रा. लोणीकाळभोर, जि. पुणे) यांचा समावेश होता. पोलिसांनी या चौघांनाही अटक केल्यावर त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून हा काळा धंदा करत असल्याची कबूली दिल्याचेही एफआयआरमध्ये नमूद आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल २२ किलो गांजा, महागडी कार, चार महागडे मोबाईल, असा किमान ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. आता या गांजाची किंमत बाजारभावानुसार कमी-जास्त असेल. गांजा सरासरी लाख ते सव्वा लाख रुपये किलोने विकला जातो. साहिल काजीकडे पोलिसांना २२ किलो गांजा सापडला. एफआयआरमध्ये मुद्देमालाची किंमत दिली नसली तरी, आ. रोहित पवारांनी मात्र त्यांच्या पोस्टमध्ये तब्बल कोटभर रुपयांचा गांजा सापडल्याचे म्हटले आहे.

याच पोस्टमध्ये रोहित पवारांनी दोन धक्कादायक आरोप करत, या साहिल काजीचे प्रा. राम शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतचे काही फोटोही पुरावे म्हणून जोडलेत. सोशल मिडिया प्लॅटफाँर्म एक्सवर रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यासह भाजपलाही धारेवर धरलंय. राम शिंदे हे आपल्या राजकीय नेटवर्कचा वापर करुन, ड्रग्ज तस्करांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. कायद्याचे धडे देणारे मुख्यमंत्री या प्रकरणात काय भूमिका घेणार? असा सवालही त्यांनी विचारला.

रोहित पवारांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा संदर्भही या गांजा तस्करीशी जोडला. पोस्टमध्ये ते म्हणाले की, कर्जत-जामखेडमधील सोसायट्यांचे ठराव मिळविण्यासाठी निवडणुकीत जो पैशांचा पाऊस पाडला गेला, त्यासाठीचे काळे ढग याच गांजा तस्करांच्या माध्यमातून तर आले नव्हते ना, अशी शंकाही येते. म्हणजेच, याच गांजा तस्करीतील काळ्या पैशाचा वापर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केला जात असल्याचं, रोहित पवारांचं म्हणणं आहे. विधान परिषदेचा कोणी सदस्य जर सभागृहाच ड्रग्जचा मुद्दा उपस्थित करणार असेल, तर त्या सदस्यांनी उगाच आपला वेळ वाया घालवू नये, काहीच कारवाई होणार नाही, असं रोहित पवारांचं म्हणणं होतं. हे प्रकरण व रोहित पवारांचा आरोप गंभीर आहे.

रोहित पवारांच्या या पोस्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. रोहित पवारांच्या या आरोपाला भाजप व स्वतः प्रा. राम शिंदे हे काय उत्तर देतात, हे आता पहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button