Explained

Fake Milk Racket | नगरचे ‘ते’ १०० भेसळखोर आणि तुकाराम-नरहरी जोडगोळी; दूध भेसळीचं काळं रॅकेट…

सध्या राज्यातलं सगळ्यात जास्त चर्चेतलं डिपार्मंट कोणतं, तर एफडीए.राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि याच डिपार्टमेंटच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारलेले धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे ही महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातील अत्यंत चर्चेत असलेली जोडी ठरलीय.मुंढे यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या सोबत काम करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. आणि गेल्या महिना-दीड महिन्यांत, महाराष्ट्रात कारवायांचा धडाका सुरु झाला.अवैध गुटखा,बोगस औषधे, बनावट दूध, हाँटेलातील खाद्यपदार्थ, खवा, पेढे, आणि खाद्यतेलाच्या भेसळीविरुद्ध धडक मोहीम सुरु झाली. भल्याभल्यांना दणके बसायला सुरुवात झाली.आता याच डिपार्टमेंटने ३ जुलैला एक महत्त्वाचा आदेश दिला.दुधामध्ये पाणी किंवा अन्य कोणतेही पदार्थ मिसळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४५ जणांवर दूध भेसळीचे गुन्हे दाखल झालेत. आता या सर्वांवर फौजदारी कारवाई होतेय का? हे पहावे लागेल. नगर जिल्ह्यात आत्तापर्यंत पारनेर, वाळकी, काष्टी, जामखेड, राहुरी, कोपरगाव, नेवासा,श्रीरामपूर येथील दूध भेसळीवर कारवाई झाली. ही व्याप्ती रोज वाढतेय. दोन दिवसांपूर्वी मंचर दूधभेसळ प्रकरणात राहुरीचे तिघे व वाळकीच्या एका जणावर फौजदारी गुन्हा दाखल झाला. बोगसगिरी करणारी ही साखळी तपासात हनुमाच्या शेपटीसारखी वाढतच जाणार आहे. या सगळ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशीच नगरकरांची अपेक्षा आहे.

राज्यात सगळ्यात जास्त दूध कुठून येतं, तर आपल्या नगरमधून. नगरला रोज ४८ लाख लिटर दूध संकलीत होतं. आता नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त दुभती जनावरे आहेत का? तर नाही. दोन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १३ लाख १६ हजार गायी-म्हशी, २ लाख ८३ हजार वासरे आणि १४ लाख ७९ हजार शेळ्या व मेंढ्या होत्या. दोन वर्षांत साधारणतः ५० हजार दुभती जनावरे वाढली, असं समजू. पण तरीही, रोज ४८ लाख लिटर दूध संकलीत होणं, हा आकडा जरा शंकास्पदच होता.पण तरीही राज्यातील नंबर एकचं दूध संकलन करणारा जिल्हा म्हणून नगरकरांनी काँलर टाईट होत होती. परंतु गेल्या वर्षभरापासून याच टाईट काँलरनं स्वतःहून मान खाली टाकली.नगर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन, स्थानिक गुन्हे शाखेने विविध तालुक्यांमध्ये छापे टाकून दूध भेसळीचे मोठे कारखाने आणि रॅकेट उघडकीस आणले .

जिल्ह्यात प्रामुख्याने रासायनिक पदार्थ, पाल्मोलीन तेल, शॅम्पू आणि पावडर वापरून कृत्रिम दूध तयार करण्याचे प्रकार समोर आले. राहुरी, कोपरगाव, कर्जत, श्रीगोंद्यातील काष्टी त्यानंतर जामखेडमधील फक्राबाद असे एकामागून एक कारवायांचे धक्के बसत गेले. फक्राबादमध्ये तर कहरच झाला.तेथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर आणि शेतवस्तीवर रसायनांचा वापर करून बनावट दूध तयार करण्याचा अड्डा उघडकीस आणला गेला.२०० लिटर अस्सल दुधामध्ये, तब्बल १५० लिटर लिक्विड केमिकल आणि पाणी मिसळून २००० लिटर कृत्रिम दूध तयार केलं जात होतं.त्यापूर्वी काष्टीतही असाच बनावट दूध तयार करण्याचा कारखाना हाती लागला. श्रीगोंदा तालुक्यातून दररोज १ लाख ६० हजार लिटर दूध संकलीत होत होतं. परंतु काष्टीचा कारखाना उद्धवस्त केल्यावर या तालुक्यात फक्त ६० हजार लिटर दूध संकलीत होऊ लागलं. म्हणजेच एकट्या श्रीगोंद्यात १ लाख लिटर बनावट दूध तयार केलं जात होतं.

एकीकडे नगरमध्ये कारवाया होत असताना, त्या तपासातून एफडीएच्या हाती अंतरजिल्हा भेसळ करणारी साखळी सापडली. ७ जुलैला पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये मोठी कारवाई झाली.त्यात २ लाख ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. २६ जणांवर गुन्हे दाखल झाले.त्या रॅकेटचे धागेदोरेही नगरपर्यंत आले.ज्या २६ जणांवर गुन्हे दाखल झाले त्यात राहुरी तालुक्यातील तिघांसह नगरजवळील वाळकीतील एक जण होता.शिवाय नगरचा एक मोठा बँण्डही एफडीएच्या रडारवर आला.या तपासात नगरमध्ये बनावट दूध तयार करणारी एक भयानक साखळी असल्याचे समोर आले. मंचरच्या रॅकेटशी थेट संबंध आढळल्यामुळे राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉं व मोरवाडी येथील प्रमोद घोरपडे, सोनगाव-सात्रळ येथील प्रकाश कडू व अजित कारंडे, आणि नगर तालुक्यातील वाळकी येथील शुभम गिरवले यांच्या दूध संकलन केंद्रांची आणि व्यवहारांची सध्या कडक चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.जामखेड, काष्टी, कोपरगाव, राहुरीत यापूर्वी झालेल्या कारवायांत तब्बल ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता पुन्हा या चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय नेवासा, शेवगाव, पारनेर, श्रीरामपूर या तालुक्यातील भेसळखोरही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे आरोपीची संख्या थेट १०० च्या घरात जाण्याची शक्यता आहे. याच कारवाईदरम्यान शिर्डीतील पेढ्यांची कारवाईही महत्त्वाची ठरली. अजूनही ही कारवाई सुरुच आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लेखी आदेश पाठवून दूध, दही, खवा, आणि तुपातील भेसळीवर थेट फौजदारी गुन्हे नोंदवण्यास सांगितले आहे.राज्यात दुधात पाणी किंवा कोणताही बाह्य घातक पदार्थ मिसळून दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात आता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अत्यंत कडक आदेश देण्यात आले आहेत.या नवीन नियमावलीनुसार,दोषी आढळणाऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकणार आहे. पाच जिल्ह्यात केलेल्या कारवाईत एफडीएनं तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय. नगर जिल्ह्यातील काही दूध संकलन केंद्रांवर एफडीएची नजर आहे. एफडीएनं हे सगळं उघड केल्यावर, नगरकरांच्या जिवाशी कसा खेळ केला जात होता, हे समोर येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button