
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. एका कुटुंबाने देशसेवेची अशी परंपरा जपली आहे की, आज संपूर्ण जिल्हा त्यांचे कौतुक करत आहे.
पारनेर शहरातील महाजन मळा येथील गायकवाड कुटुंबातील दोन सख्ख्या भावांनी एकाचवेळी भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पद मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलाही भारतीय सैन्यदलात सुभेदार मेजर म्हणून कार्यरत आहेत.
मंडळी, भास्कर तुकाराम गायकवाड हे गेल्या तब्बल २८ वर्षांपासून भारतीय सैन्यदलात सेवा बजावत आहेत. देशसेवेची हीच प्रेरणा त्यांच्या मुलांना प्रसाद आणि प्रकाश गायकवाड यांना मिळाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दोघांनीही सैन्यदलात जाण्याचा निर्धार केला.
चार वर्षांपूर्वी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या माध्यमातून दोघांची राष्ट्रीय संरक्षण अकादमी, म्हणजेच एनडीएमध्ये निवड झाली. एनडीएमधील कठोर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.
त्यानंतर देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये एक वर्षाचे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर दोघांचीही भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. एका कुटुंबातील वडील सुभेदार मेजर आणि दोन्ही पुत्र लेफ्टनंट अधिकारी.. असा दुर्मीळ योग क्वचितच पाहायला मिळतो.





