
एकेकाळी ग्राहकांची पहिली पसंती असलेल्या डीमार्टला आता क्विक कॉमर्सच्या स्पर्धेपुढे मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.
भारतातील ऑनलाइन किराणा बाजारात ब्लिंकिट, झेप्टो आणि स्विगी इन्स्टामार्ट यांसारख्या क्विक कॉमर्स कंपन्यांची झपाट्याने वाढ होत आहे.
या वाढत्या स्पर्धेचा परिणाम आता डीमार्टवरही दिसू लागला आहे. डीमार्ट चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्ट्सने आपल्या ‘डीमार्ट रेडी’ या ऑनलाइन सेवेचा विस्तार कमी करत तब्बल सात शहरांमधील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ही सेवा केवळ ११ शहरांमध्ये सुरू राहणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ज्या शहरांतून अत्यल्प महसूल मिळत होता, तेथून सेवा बंद करून मोठ्या शहरांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.
दुसरीकडे, ग्राहकांना १० ते २० मिनिटांत सामान पोहोचवणाऱ्या क्विक कॉमर्स कंपन्या अधिक लोकप्रिय होत आहेत. पण, डीमार्ट आपल्या कमी किमतीच्या धोरणावर ठाम आहे आणि म्हणून तीचा महसूल आणि नफा सुद्धा वाढला आहे.





