Latest

आता तुमच्या मालमत्तेचे ‘व्हॅल्युएशन’ होणार घरबसल्या ! पाच दिवसांचे काम २४ तासांत

मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आलीये. आता तुमच्या घर, जमीन किंवा दुकानाचे ‘व्हॅल्युएशन’ पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे आणि विशेष म्हणजे, यासाठी आधीसारखे पाच-पाच दिवस वाट पाहावी लागणार नाही.

मंडळी, सरकार आता मालमत्तेच्या मूल्य निर्धारणाची प्रक्रिया डिजिटल करत आहे. या नवीन पद्धतीनुसार नागरिकांना फक्त शासकीय पोर्टलवर जाऊन मालमत्तेचे क्षेत्रफळ आणि सर्व्हे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ऑनलाइन शुल्क भरताच संगणकीय प्रणालीद्वारे मालमत्तेचे मूल्यांकन तयार होणार आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हॅल्युएशन रिपोर्ट पूर्णपणे कायदेशीर वैध असणार आहे. कारण त्यावर संबंधित दुय्यम निबंधकांची डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा मोठा वेळ, पैसा आणि त्रास वाचणार आहे. आतापर्यंत ही प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल होती.

अर्ज केल्यानंतर अधिकारी छाननी करायचे, जागेची पाहणी व्हायची आणि रेडी रेकनरनुसार गणना केली जायची. त्यामुळे अनेकदा पाच दिवस किंवा त्याहून अधिक वेळ लागत होता. पण आता पोर्टलवर माहिती भरताच केंद्रीय डेटाबेस आणि रेडी रेकनर दरांनुसार संगणकीय प्रणाली थेट मूल्यांकन तयार करणार आहे. म्हणजे जे काम आधी पाच दिवस चालायचं, ते आता अवघ्या २४ तासांत पूर्ण होणार आहे. मंडळी, हा बदल सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button