
अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान मोठी दुर्घटना घडली. ईदच्या पार्श्वभूमीवर जमाव नियंत्रणाचा सराव सुरू असताना स्मोक ग्रेनेड हाताळताना अचानक स्फोट झाला आणि तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने तिघांनाही किरकोळ दुखापत झाली.
घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे — जवानांना पुरेसं प्रशिक्षण दिलं होतं का? जखमी कर्मचाऱ्यांच्या सहकाऱ्यांचा आरोप आहे की, कोणतेही सखोल प्रशिक्षण न देता स्मोक ग्रेनेड वापरायला देण्यात आले. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या प्रशिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मात्र, राखीव पोलिस निरीक्षक विनोद परदेशी यांनी हे आरोप फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार, दंगल नियंत्रण पथकातील जवानांना स्मोक ग्रेनेड हाताळण्याचे पूर्ण प्रशिक्षण दिले जाते. चुकून सेफ्टी पिन निघाल्यामुळे हा स्फोट झाला.
स्मोक ग्रेनेड म्हणजे धुराचे दाट ढग निर्माण करणारे उपकरण. याचा वापर जमाव पांगवणे, लष्करी कारवाया आणि सिग्नल देण्यासाठी केला जातो. मात्र, ते हाताळताना अत्यंत काळजी आणि योग्य प्रशिक्षण आवश्यक असते.





