
आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सरकारने आता ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ जाहीर केली असून, वारीदरम्यान अपघात किंवा दुर्घटना झाल्यास वारकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाखोंची आर्थिक मदत मिळणार आहे.
मंडळी, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या योजनेची माहिती दिली. ७ जुलै ते २५ जुलै या कालावधीत ही योजना लागू राहणार आहे. पंढरपूरला पायी, खासगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
वारीदरम्यान अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांना तब्बल ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, अपघातात ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार , अपंगत्व ६० टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर तब्बल अडीच लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
याशिवाय, वारकरी रुग्णालयात दाखल झाल्यास १६ हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे. या योजनेचे अनुदान मंजूर करण्याचे आणि वितरित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, मदत मिळवण्यासाठी तहसीलदारांचे प्रमाणपत्र आणि आवश्यक वैद्यकीय कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
मंडळी, दरवर्षी लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करतात. अशा परिस्थितीत ही योजना वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.





