
उच्च शिक्षण घ्यायचं आहे, पण नोकरी, व्यवसाय, घरची जबाबदारी असल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलंय का? तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मंडळी, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच इग्नूने विविध पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केलीये.
विशेष म्हणजे हे शिक्षण घरबसल्या, मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पद्धतीद्वारे घेता येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरी करणारे युवक-युवती, व्यावसायिक, गृहिणी, दिव्यांग व्यक्ती तसेच नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नसलेल्या सर्वांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
यंदा इग्नूमध्ये ३०० पेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू आहेत. यामध्ये बीए, बीकॉम, बीएससी, बीसीए, एमए, एमकॉम, एमसीए, एमबीए यांसारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांसह पर्यटन व आदरातिथ्य व्यवस्थापन, ग्रामीण विकास, ग्रंथालय व माहितीशास्त्र तसेच विविध कौशल्याधारित आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश आहे.
प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होत असून विद्यार्थ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ज्यांना शिक्षणासोबत नोकरी करायची आहे, ज्यांचे शिक्षण मध्येच थांबले आहे किंवा ज्यांना घरबसल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे आहे, त्यांच्यासाठी इग्नू हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो हे नक्की.





