
पाऊस येत नाहीये… आणि आता फक्त शेतकरीच नाही, तर शहरांनाही पाण्याची चिंता सतावू लागली आहे. राज्यातील अनेक शहरात मोठं पाणी संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंडळी, अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल यंदा खूपच संथ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. याचा फटका एकीकडे शेतकऱ्यांना बसत असतानाच आता शहरांतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम दिसू लागला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मात्र बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, २४ जूननंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे कोकणाला काहीसा दिलासा मिळेल, पण इतर भागांना अजून प्रतीक्षा करावी लागू शकते.
दरम्यान, ठाणे शहरासमोर मोठं पाणी संकट उभं राहिलं आहे. भातसा धरणात केवळ ११ टक्के तर बारवी धरणात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासन अतिरिक्त पाणी कपातीचा विचार करत आहे. जर लवकर पाऊस झाला नाही, तर आगामी दिवसांत ठाणे आणि आसपासच्या भागातील नागरिकांना गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.





