
देशाच्या रक्षणासाठी सीमेवर उभा राहणाऱ्या जवानालाच सहकाऱ्यांच्या कथित छळामुळे आयुष्य संपवावं लागलं. सैन्यदलाला हादरवणारी ही घटना समोर आली आहे आपल्या अहिल्यानगरमधून.
मंडळी, आर्मी एरियात कार्यरत असलेल्या अप्पाराव महादेव ठोंबरे यांनी राहत्या क्वार्टरमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मृत्यूमागे सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नायब सुभेदार निलकमल आणि हवालदार सचिन खेडकर हे दोघे अप्पाराव यांना वारंवार मानसिक त्रास देत होते. इतकंच नाही, तर त्यांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून तिला आपल्याकडे पाठवण्यास सांगितल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
तसेच, नोकरीत काम करू देणार नाही, वरिष्ठांकडे तक्रार करून अडचणीत आणू आणि हवी ती रजा मिळू देणार नाही, अशा धमक्या दिल्याचं पत्नीने फिर्यादीत म्हटलं आहे.
या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून दोघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





