
नाशिक ते शिर्डी रेल्वे प्रवास आणखी जलद होणार आहे. कारण बहुचर्चित दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रत्यक्ष वेग आला आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावानुसार नाशिक-शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील तब्बल 34 गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून लवकरच गट क्रमांकांची यादी जाहीर होणार आहे. या प्रकल्पात सिन्नर तालुक्यातील 23 आणि नाशिक तालुक्यातील 11 गावांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा देऊन पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोबदल्याचा! प्रशासनाच्या माहितीनुसार, 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार आणि रेडीरेकनर दराच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. जमिनीचे बाजारमूल्य, स्थान आणि इतर निकषांचा विचार करून अंतिम मोबदला निश्चित केला जाईल.
दरम्यान, रेल्वेमार्गाची अंतिम लांबी, स्थानकांची संख्या आणि नेमकी ठिकाणे अद्याप जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे आता शेतकरी, नागरिक आणि रेल्वेप्रेमींचे लक्ष पुढील घोषणांकडे लागले आहे.





