
“तुमच्या गावातील किराणा दुकानातही सुटे तेल मिळणं अचानक बंद झालंय का? यामागचं कारण काय आहे आणि याचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो? चला जाणून घेऊया.”
मंडळी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक किराणा दुकानांमध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद झाली आहे.
आता ग्राहकांना खुल्या स्वरूपातील तेलाऐवजी थेट कंपनीचे सीलबंद एक, पाच किंवा दहा लिटरचे पॅक खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की, आतापर्यंत विकले जाणारे सुटे तेल नेमके किती शुद्ध होते ?
तज्ज्ञांच्या मते भेसळयुक्त तेलामध्ये पामतेल, वापरलेले तेल, खनिज तेल किंवा इतर स्वस्त पदार्थ मिसळले जाऊ शकतात. अशा तेलामुळे हृदयविकार, अपचन, त्वचारोग आणि इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आता ग्राहक अधिक जागरूक होत असून, शुद्ध आणि सुरक्षित खाद्यतेलाची मागणी वाढताना दिसत आहे.





