
अहिल्यानगर, नाशिक आणि खानदेशातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जूनच्या अखेरीस या भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली असली तरी पुढील काही दिवसांत परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, 23 जूनपासून मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ शकते.
वेंगुर्ला, देवगड आणि हर्णाईसारख्या किनारी भागांमध्ये मान्सूनच्या सरींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यानंतर 25 जूनच्या आसपास मुंबईत मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत मान्सून पोहोचल्यानंतर त्याचा प्रभाव राज्याच्या अंतर्गत भागांवरही दिसू शकतो.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात अहिल्यानगर, नाशिक, खानदेश, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि पश्चिम मराठवाड्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मात्र पूर्व मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना पावसासाठी जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. शेतकरी, नागरिक आणि पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी ही नक्कीच आशादायक बातमी आहे.





