
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. अमृता फडणवीस यांनी सणासुदीचे दिवस लक्षात घेता जरांगे शांततेच्या मार्गाने आंदोलन करतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यावर जरांगे पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.
“अमृता ताईंना शब्द दिला आहे, आंदोलन शांततेनेच होणार,” असं जरांगे म्हणाले. त्यांनी अमृता फडणवीस यांनी टोमणा किंवा खुन्नस देऊन भाष्य केलं नसल्याचं सांगितलं. इतकंच नाही, तर भाऊबिजेला त्यांच्याकडे जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
मात्र, दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीवर जरांगे आक्रमकच आहेत. २९ ऑगस्टपासून सुरू असलेलं उपोषण आणि मुंबईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शरीर साथ देत नसल्याचं सांगत ही शेवटची लढाई असल्याचंही ते म्हणाले.
आता अमृता फडणवीसांना दिलेला शब्द आणि आरक्षणासाठीचा आक्रमक निर्धार… या दोन्हींचा समतोल जरांगे कसा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.





