
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीच्या छाननीत श्रीगोंदा सोसायटी मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद करण्यात आले आहेत.
नाहाटा यांनी अर्जासोबत सोसायटीचा ताळेबंद आणि लेखापरीक्षण अहवालासह आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, संबंधित सोसायटी क वर्गात असल्याचे छाननीत समोर आले. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला.
दुसरीकडे, बबनराव पाचपुते यांनी ज्या सोसायटीचा ठराव घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ती सोसायटीदेखील क वर्गात असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी पाचपुते यांचाही अर्ज बाद करण्यात आला.
श्रीगोंदा मतदारसंघातील या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसला आहे. आता नाहाटा-पाचपुते यांच्या अर्जावर झालेल्या निर्णयानंतर पुढची राजकीय रणनीती काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





