
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नवीन खरीप कांद्याची आवक बाजारात वाढू लागली आहे. ताजा कांदा उपलब्ध झाल्याने व्यापारी आणि निर्यातदारांकडून त्याला पसंती मिळत आहे. याचा थेट परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यातील कांद्याच्या मागणीवर झाला असून घाऊक दर काहीसे घसरले आहेत.
राहाता बाजार समितीत कांद्याला क्विंटलमागे ७०० ते ४६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. गेल्या आठवड्यात याच बाजारात प्रथम दर्जाच्या कांद्याला ५००० ते ५५०० रुपये दर होता.
पाथर्डी आणि जामखेडमध्ये १००० ते ४१००, संगमनेरमध्ये १००० ते ५०००, कोपरगावात १००० ते ४१००, तर नेवाशात १००० ते ३९५५ रुपये क्विंटल दर नोंदवला गेला.
चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक दर गेल्या महिन्यातील ५७०० रुपयांवरून आता ४६०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र दुसरीकडे शहरातील किरकोळ बाजारात ग्राहकांना कांद्यासाठी अजूनही ५५ ते ६५ रुपये किलो मोजावे लागत आहेत. आता आवक, निर्यात आणि देशांतर्गत मागणीवर कांद्याच्या दराचे पुढील गणित ठरणार आहे.





