
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलीय. केंद्र सरकारने गव्हासह सहा रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजेच हमीभावात वाढ करण्यास मंजुरी दिलीय.
विशेष म्हणजे, उत्पादन खर्चावर किमान ५० टक्के नफा मिळण्याचं सूत्र यामागे असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय.
२०२७-२८ च्या विपणन वर्षासाठी गव्हाचा हमीभाव २५ रुपयांनी वाढून आता २ हजार ६१० रुपये प्रतिक्विंटल झालाय. तर बार्लीच्या दरात १३६ रुपये, हरभऱ्यात ८३ रुपये, मसुरात ३९० रुपये, मोहरीत ४१३ रुपये आणि करडईच्या हमीभावात सर्वाधिक ६७५ रुपयांची वाढ करण्यात आलीय.
विशेष म्हणजे, गव्हाचा उत्पादन खर्च १ हजार २६४ रुपये असताना त्याचा हमीभाव २ हजार ६१० रुपये निश्चित करण्यात आलाय. आता या वाढीचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांच्या पदरात किती पडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





