
घंटागाडी आली की नाही, कचरा उचलला की नाही, हे एका क्लिकवर समजावे म्हणून महापालिकेने लाखो रुपये खर्च करून प्रत्येक घराला QR कोड लावले. मात्र, वर्षभरानंतरही या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नाही. मग हा सगळा खर्च नेमका कशासाठी?
अहिल्यानगर शहरात दररोज तब्बल १२० टन कचरा संकलित केला जातो. यासाठी ६५ घंटागाड्या आणि सुमारे ३५० कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील १७ प्रभागांमध्ये कचरा संकलनाचे काम केले जाते.बोल्हेगाव, सावेडी, केडगावसह अनेक भागांत घंटागाडी नियमित येत नसल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर QR कोडची योजना सुरू करण्यात आली.
घंटागाडी आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कोड स्कॅन करायचा आणि त्याची नोंद थेट महापालिकेच्या अॅपवर व्हायची. त्यामुळे घंटागाडी कुठे गेली, कोणत्या घरासमोर थांबली आणि कचरा संकलित केला का, यावर अधिकाऱ्यांना लक्ष ठेवता येणार होते.
मात्र, प्रत्यक्षात अनेक घरांवरील QR कोड गळून पडले आहेत, तर काही ठिकाणी ते केवळ शोभेची वस्तू बनले आहेत.योजना राबवली, लाखो रुपये खर्च केले; पण देखरेख आणि अंमलबजावणीचा मात्र पत्ता नाही!
मग QR कोड लावून महापालिकेने नेमके साधले काय? योजना कागदावरच यशस्वी झाली की प्रत्यक्षातही? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.





