
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पाऊस उशिरा येणार असला तरी यंदा दुष्काळ पडणार नाही, असा मोठा दावा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केला आहे.
मंडळी, राज्यात मान्सूनला उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेरण्या खोळंबल्या असून अनेकजण आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र अशातच हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील वडाळा बहिरबा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना पंजाबराव डख म्हणाले की, यंदा दुष्काळ पडणार नाही. 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात मोसमी पावसाला सुरुवात होईल आणि अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडेल.
डख यांनी यापूर्वीच जानेवारी महिन्यात पाऊस उशिरा येईल, असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच 10 जुलै ते 15 जुलै दरम्यान पुन्हा पावसाचा जोर वाढेल, असेही त्यांनी सांगितले.
त्यांच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियोजनपूर्वक शेतीची कामे सुरू ठेवावीत, असा संदेश पंजाबराव डख यांनी दिला आहे.





