
अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा सस्पेन्स निर्माण झालाय ! ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नेमके पक्षाच्या बैठकीत होते की बाहेरगावी? या एका प्रश्नामुळे पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली आहे.
मित्रांनो, सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटातील काही खासदार संपर्कात असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती.
पक्षाच्या माहितीनुसार, काही खासदार प्रत्यक्ष तर काही ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले. यामध्ये शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. मात्र याचवेळी त्यांच्या कुटुंबीयांनी ते कौटुंबिक कारणासाठी बाहेरगावी गेल्याचे सांगितल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या संपर्काबाबत विचारलेल्या प्रश्नावरही वाकचौरे यांनी थेट उत्तर देणं टाळलं होतं. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. वाकचौरे नेमके कोणत्या भूमिकेत आहेत?
ते ठाकरे गटासोबत ठाम आहेत की राजकारणात नवी घडामोड घडणार? या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काही दिवसांत मिळणार आहेत, त्यामुळे नगरच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलं आहे.





