गुगलवर सध्या बोत्रे पाटलांची बातमी ट्रेंडिंगला आलीय. कारण आहे, बोत्रे पाटलांच्या ओंकार शुगर ग्रुपवर होत असलेला, दोन हजार कोटींच्या थकबाकीचा आरोप… काहींच्या मते हे फक्त राजकारण आहे. खरं तर, बंद पडलेले साखर कारखाने चालू करुन बोत्रे पाटलांनी साखर उद्योगाला नवसंजिवनी दिलीय. तर काहींच्या मते फेब्रुवारीपासून त्यांनी शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही. आता हे बोत्रे पाटील कोण? तर महाराष्ट्र- कर्नाटकातील तब्बल 17 कारखान्यांचे मालक… गेल्या सहा वर्षांत, त्यांच्या ओंकार शूगर ग्रुपने बंद पडलेल्या अनेक साखर कारखान्यांना झळाली दिली. उद्योगात नवसंजीवनी आणली. पण आता याच बोत्रे पाटलांवर दोन हजार कोटी रुपये थकविल्याचा आरोप होऊ लागलाय. आता हे बोत्रे पाटील कोण? त्यांच्यावर आरोप काय? आणि गुगलचा ते ट्रेंडींग येण्याचा विषय काय?
पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, माजी आ. संजय शिंदेंचा म्हैसगाव साखर कारखाना, रावसाहेब दानवेंचा कारखाना, श्रीगोंद्याचा गौरी शूगर, अक्कलकोटचा ताडवळ साखर कारखाना, श्रीगोंद्याचाच दैवदैठणचा साखर कारखाना, नंदुरबार जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगरचा साखर कारखाना… हे सगळे कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत, तर बोत्रे पाटलांच्या… बाबूराव बोत्रे पाटीलांनी 2017 ला ओंकार समुह सुरु केला. त्यानंतर हे सगळे कारखाने अवघ्या 6 वर्षांत विकत घेतले. महाराष्ट्रातील 14 आणि कर्नाटकातील 3, असे तब्बल 17 आजारी कारखाने बोत्रे पाटलांनी सुरु केले. या सगळ्या कारखान्यांचा हिशोब काढला तर, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या एकूण साखरेपैकी निम्म्यापेक्षा जास्त साखर ही हेच बोत्रे पाटील तयार करतात. यंदाच्या गाळत हंगामात महाराष्ट्रात 98 लाख मेट्रीक टन गाळप झाले. त्यापैकी 48 लाख टन गाळप हे बोत्रे पाटलांच्या ओंकार शूगरने केले. विशेष म्हणजे, याच ओंकार शुगरचा साखर उतारा राहिला प्रतिक्विंटल 10.35… ज्यांना साखर उद्योगातलं कळतं, त्यांना समजेल की, जवळपास साडेदहाचा उतारा म्हणजे परफेक्ट नियोजन…
एकीकडे उसाचा वाढलेला एफआरपी, सहा वर्षांपासून न बदललेला साखरेचा विक्री दर, गैरव्यवस्थापन, गाळप हंगामाची स्पर्धा… अशा सगळ्या संकटातही ओंकार ग्रुपने साखर धंदा नफ्यात आणला. हे सगळं एकटं बोत्रे पाटील करतात का? जिथं साखर सम्राटांना एक कारखाना चालवायला नाकी नऊ येतात, तिथं हा पठ्ठ्या 17 कारखाने चालवतोच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला. बोत्रे पाटलांमागे कुणीतरी मोठ्ठा हात असावा, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव आले. सरकारचेच काही मंत्री व वरिष्ठ नेते बोत्रे पाटलांना बॅकअप देत असावेत, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या. बोत्रे पाटलांना हे व्यवस्थापन जमलं कसं? हे कोडंच होतं. कारण बोत्रे पाटील हे आजारी कारखाने विकत घेत होते. त्यांच्याकडील 17 कारखान्यांची थकबाकी ही तब्बल 1269 कोटींची होती. तरीही केवळ एक-दोन हंगामातच, त्यांनी ही सगळी देयके अदा केली. ही जादूच होती. बोत्रे पाटलांनी महाराष्ट्रातील नऊ खासगी व पाच सहकारी कारखाने, आजारपणातून बाहेर काढले. हे अनाकलनीयच होतं. त्यामुळेच बोत्रे पाटलांमागे कुणीतही अदृश्य शक्ती कार्यरत आहे, अशा चर्चा सुरु राहिल्या.
महाराष्ट्रातील साखर उद्योग पाहिला तर, गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात या उद्योगावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिलीय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाच्याच नेत्यांकडे हा उद्योग गेली कित्येक वर्षे होता. परंतु त्यापैकी 90 टक्के कारखाने हे आजारी होते. या उद्योगात पैसा होता, परंतु नियोजन नव्हते. अनेकजण तर फक्त स्वतःचा खिसा भरण्यासाठी व राजकारणाला पैसा पुरविणारा उद्योग म्हणून साखर उद्योगात शिरले होते. परंतु बोत्रे पाटलांनी ही साखळी तोडली. म्हणूनच सत्ताधारी भाजप बोत्रे पाटलांच्या पाठीशी असेल, अशा शंका उपस्थित केल्या गेल्या.
हा झाला बोत्रे पाटलांबाबतचा एक भाग. साखर आयुक्तालयाचा ताजा अहवाल पाहिला तर, फेब्रुवारी 2026 पर्यंत ओंकार शुगरने 50 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1279 कोटी रुपयांची बिलेही जमा केली. परंतु फेब्रुवारीपासून एप्रिल महिन्यांपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांचे पेमेंट थकवले, असं काही बातम्यांत म्हटलंय. खरंतर गाळप झालेल्या उसाचं 15 दिवसांत पेमेंट, कामगारांना पाच तारखेच्या आत पगार, 16 हजार कर्मचाऱ्यांचं नेटवर्क आणि दोन लाख वाहतुकदारांचा तारणहार म्हणून बोत्रे पाटलांकडे पाहिलं गेलं. परंतु गेल्या तीन महिन्यांत, चक्र फिरलं आणि बोत्रे पाटीलांवर दोन हजार कोटींच्या थकबाकीचं लेबल चिकटलं. बोत्रे पाटील गेल्या तीन महिन्यांपासून, याबाबत कुणालाही काहीच सांगत नसल्याचा आरोपही काही बातम्यांमध्ये झालाय. आता यातील किती खरं आणि किती खोटं, हे येत्या काही दिवासांत समजेल. बोत्रे पाटील अडकले, हे आत्ताच म्हणणं योग्य ठरणार नाही. परंतु काहीतरी झालंय, हे मात्र नक्की…





