
अहिल्यानगरमध्ये एक रहस्यमय आणि खळबळजनक प्रकार समोर आलाय. घरातील वस्तू अचानक पेट घेत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेय. मंडळी, देवळाली प्रवरा शहरातील लक्ष्मणनगर परिसरात हा विचित्र प्रकार घडत आहे.
साईनाथ रणधिर आणि सचिन रणधिर यांच्या घरात गेल्या चार वर्षांपासून अशा घटना घडत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. घरातील कपडे, कागदपत्रे, फ्रीजजवळील साहित्य आणि अगदी स्वयंपाकघरातील काही वस्तूंनाही अचानक आग लागत असल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. त्यामुळे घरातील सदस्य मोठ्या भीतीखाली जगत आहेत.
इतकंच नाही, तर काही ठिकाणी लिंबू-मिरची, कुंकू आणि इतर संशयास्पद वस्तू देखील आढळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही जणांनी या प्रकरणामागे जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार असू शकतो, असा संशय व्यक्त केलाय.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारीही घटनास्थळी पोहोचले. जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांनी पाहणी करून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. या संपूर्ण प्रकाराची वैज्ञानिक पद्धतीने तपासणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मंडळी, सध्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे. नेमकं हे प्रकार कशामुळे घडत आहेत, याचं उत्तर आता तपासातूनच समोर येणार आहे.





